अहिल्यानगर: ४३७ वर्षांची ऐतिहासिक परंपरा व धार्मिक वारसा असलेली राज्यातील गोपाळ समाजाची क्षेत्र मढी येथील मानाची होळी पारंपारिक पद्धतीने उत्साहात व शांततेत समाजाने ठरवलेल्या मानकरी यांच्या हस्ते पेटली. कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष नाथभक्तांनी यावेळी केला. राज्यभरातुन आलेल्या गोपोळ समाजाच्या बांधवांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
मढी येथील चैतन्य कानिफनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम व मोठा दगडी शिळा पाषाण आदींची वाहतूक करत गडाच्या उभारणीसाठी गोपाळ समाजाने मोठे कष्ट घेतले. गोपाळ समाजाची मदत श्रद्धायुक्त अंतकरणाने झाल्याने चैतन्य कानिफनाथांच्या आशीर्वादानुसार मढी येथील सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान राज्यातील गोपाळ समाजाला देण्यात आला असून मढीचे ग्रामस्थ आज होळीचा सण साजरा करत नाहीत.

राज्यातील गोपाळ समाज हा पूर्वी दुग्ध व्यवसाय करून राज्यभर भटकंती करून स्वत:ची गुजरात करत बदलत्या काळानुसार शेती व्यवसाय नोकरी उद्योगांमध्ये या समाजाची प्रगती सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हा समाज त्यांच्या विद्येच्या व कसरतीच्या जोरावर स्वत:चा दबदबा ठेवून होता. गोपाळ बांधवांनी मोठ्या प्रमाणात कष्ट करत नाथांची कृपा प्राप्त केल्याने कानिफनाथ हे त्यांचे कुलदैवत बनले.
अठरापगड जातीचे भटके समाज आजही नाथांची अत्यंत श्रद्धेने सेवा करतात सुमारे २५ वर्षांपूर्वी होळी पेटविण्यावरून मानपानाची लढाई मुद्द्यावरून गुद्यावर आली. पोलिसांना लाठीमार करावा लागला व त्यातून बरीच वर्षे होळीची प्रथा बंद राहिली. त्यानंतर न्यायालयातून निवाडा करत प्रतिकात्मक स्वरूपात गावातील दत्त मंदिराच्या बारवेजवळ प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवर होळी पेटविण्याची प्रथा सुरू झाली.
आज सायंकाळी समाजातील मानकरी माणिक लोणारे येवला,नामदेव माळी गेवराई ,रघुनाथ काळा पहाड पाथर्डी, हरिभाऊ गव्हाणे बेलगाव, भागिनाथ नवघरे कोळपेवाडी या मानकऱ्यांना देवस्थान समितीने मानाच्या गोवऱ्या दिल्या. डफ ताशाच्या वाद्यासह गोपाळ बांधवांनी नाथांचा जयजयकार करत गडावर पोहोचले तेथे देवस्थान समितीतर्फे त्यांचा सन्मान करत गोऱ्या देण्यात आल्या.
समाजाचे मानकरी ज्ञानदेव गिऱ्हे शिरूर यांना होळीच्या पारापर्यंत गोवऱ्या या डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान आहे. त्यामुळे त्यांनी नाथांच्या मंदिरापासून या गोऱ्या डोक्यावर घेतल्या. गडावरून वाजत गाजत या गोऱ्या दत्त मंदिराजवळ नियोजित जागी आणण्यात आल्या तेथे होळी पेटवली.