Ahmednagar News : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या व्याज सवलत रकमेत गौडबंगाल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र नगर जिल्ह्यात ही रक्कम शेतक- यांच्या खात्यावर वर्ग करण्यात जिल्हा सहकारी बँकेकडून विलंब होत असून,

गेल्या तीन वर्षांच्या व्याजापोटी शासनाकडून मिळालेल्या तब्बल ६३ कोटींचे झाले काय? असा सवाल शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी उपस्थित करत, जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रश्नी कार्ले यांच्यासह नगर तालुका महाआघाडीच्यावतीने पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट करण्यात आला.

यावेळी माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, मडगावचे माजी सरपंच विलास शेडाळे, टाकळी काझीचे सरपंच अशोक ढगे, उपसरपंच अविनाश पवार आदी उपस्थित होते. कार्ले म्हणाले की, राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते.

मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी आणि किती वर्ग होते हे शेतकऱ्यांना माहित नाही. तसेच गावातील सोसायटीलाही समजत नाही. ही बाब काही शेतकऱ्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही दि. १९ मे २०२३ रोजी जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन या संदर्भातील माहिती मागविली होती.

त्यांच्याकडून दि. १४ जून २०२३ रोजी माहिती प्राप्त झाली. त्यानुसार गेल्या ३ वर्षात तब्बल ६३ कोटी रुपये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयाला जमा केले. मात्र जमा रकमेची तारीख आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या तारखेमध्ये मोठा विलंब दिसून येत आहे.

खंडाळा व पिंपळगाव लांडगा या दोन गावातील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शेतक यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहिले असता व्याजाची रक्कम खात्यात जमा झालेल्या तारखेत आणि उपनिबंधक कार्यालयाच्या तारखेत मोठी तफावत दिसत आहे. असाच प्रकार जिल्ह्यात झालेला असावा. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षांनी याबाबत अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe