Ahmednagar News : शहरातील ८०टक्के शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जातात. अनेक भागांत लहान मुलांच्या शाळादेखील सातच्या आसपास भरतात. त्यामुळे मुलांचे डबे बनविण्यासाठी लवकर उठून धावपळ करावी लागते. मुलांना पहाटे सहा वाजेपासून उठून दप्तराची आवराआवर करावी लागते. या धावपळीत मुलांची झोप पूर्ण होत नाही. शिवाय पालकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो.
लहान मुलांची सकाळी लवकर शाळा भरवल्यास त्यांची व्यवस्थित झोप होत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व खासगी व महापालिका शाळांची वेळ सकाळी नऊ किंवा नऊनंतर घेण्याचे आदेश दिले. परंतु, खासगी शाळांनी सकाळी ७ वाजताच शाळा भरून शासन आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या वर्गाची वेळ बदलणे आवश्यक आहे.
यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी ९ किंवा ९ नंतर सर्व माध्यमांच्या पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. परंतु, शहरातील अनेक अनुदानित, अंशतः अनुदानितसह विना अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या सकाळच्या सत्रातच भरतात.
खासगी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई शाळादेखील वर्ग सकाळच्या ७ ते ८ वाजेच्या सुमारास सकाळच्या सत्रात भरत आहेत. याबाबत एका मुख्याध्यापकाने सांगितले, अपुऱ्या इमारतीमुळे दोन टप्प्यांत शाळा भरवाव्या लागत आहेत. यात पूर्वप्राथमिक, प्राथमिक वर्ग हे सकाळच्या सत्रात भरविण्यात येतात. त्यानंतर दुपारच्या सत्रात माध्यमिक भरविले जात आहेत.
दरम्यान जिल्हा परिषदेकडून वर्ष २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून पूर्वप्राथमिक, प्राथमिकच्या शाळा सकाळच्या सत्रात भरण्यात याव्यात, याबाबत पत्र काढले आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शाळांना वेळेबाबत काही अडचणी असतील. त्यांनी शिक्षण विभागाला कळवावे, अशी सांगितले आहे मात्र याबाबत पुढे काही कारवाई झाली नाही.