Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील आकारी पडीत जमिनी देण्याच्या मागणीसाठी आकारी पडीत संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
यावेळी महसूलमंत्री विखे पाटील यांनी आकारी पडीत शिष्टमंडळाला राज्य सरकार आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याबाबत सकारात्मक असून लवकरच जमिनी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी सभापती भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यावेळी बाजार समिती संचालक गिरीधर आसने, भाजप नेते डॉ. शंकरराव मुठे, खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब बांद्रे आदी उपस्थित होते. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सन १९१८ साली तत्कालीन सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा आदी तालुक्यातील ९ गावातील शेतकऱ्यांच्या ७३६७ एकर जमिनी इंग्रज सरकारने ३० वर्षाच्या कराराने ताब्यात घेतल्या होत्या. हा करार येवला येथे संपन्न झाला होता.
त्या जमिनी २३ जुलै १९२० रोजी इंग्रज सरकारने दि. बेलापूर कंपनी इंडस्ट्रीज लिमिटेड हरेगाव या कंपनीकडे कसण्यासाठी वर्ग केल्या होत्या. या क्षेत्राला हरेगाव मध्ये वर्ग करून त्याचे हे ए.बी. सी. असे तीन वर्ग निर्माण करण्यात आले होते.
पुढे भारत देश स्वतंत्र झाला. १९६५ मध्ये कंपनीचे नाव कमी करून सरकारने या जमीन या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या ताब्यात न देता आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. या जमिनी पुढे शेती महामंडळाकडे कसण्यासाठी वर्ग करण्यात आल्या होत्या.
त्या आजतागायत शेती महामंडळाकडेच पडून आहे. त्यामुळे ९ गावातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने विविध स्वरूपाचे आंदोलने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
यावेळी आलेल्या शिष्टमंडळाला राज्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी आकारी पडीत जमिनीबाबत शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून सदरच्या जमिनी मूळ मालकांच्या वारसांना लवकरच परत देण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती माजी सभापती भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी दिली आहे.
सदरच्या निवेदनावर माजी सभापती भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, बाजार समिती संचालक गिरीधर आसने, भाजप नेते डॉ. शंकरराव मुठे, खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब बांद्रे, सुभाष आसने, डॉ. दादासाहेब आदिक, तानाजी कासार, बाळासाहेब बकाल आदींच्या सह्या आहेत.