वाढती दहशत ;अहिल्यानगर तालुक्यातील या गावातील विद्यार्थ्यांसह पालकही वैतागलेत ‘त्यांच्या’ त्रासाला : पालकांसह ग्रामस्थांनी केली ‘ही’ मागणी

Published on -

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोड रोमिओंनी धुमाकूळ घातला असून त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. जेऊर परिसरातील विद्यालयांच्या परिसरात रोड रोमिओंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असेल त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरात असणाऱ्या विद्यालयांभोवती रोडरोमिओंचा गराडा पडला आहे. विद्यालयांमध्ये सध्या परीक्षा सुरू असून रोडरोमिओंच्या वाढत्या उपद्रवामुळे विद्यार्थ्यांसह पालकही वैतागले आहेत. विद्यालयाच्या मार्गावर धूम स्टाईल गाडी चालवणे, मुलींना कट मारणे, अश्लील हावभाव करणे, नशेत असणारे रोड रोमिओ घोळक्याने राहत असून त्यांची दहशत परिसरात वाढत चालली आहे.

गाडीच्या सायलेन्सर मध्ये बदल करून विचित्र आवाज काढणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. जेऊर येथे शिक्षणासाठी पांढरीपुल, खोसपुरी, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी, वाघवाडी, चापेवाडी, डोंगरगण, इमामपूर, आढाववाडी परिसरातून विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. परंतु विद्यालया भोवती तसेच वाड्यावर जाणाऱ्या रस्त्याने मुलींची छेडछाड काढण्याचे प्रकार वाढले आहेत.

सीना नदीवरील पूल, मुंजोबा चौक परिसर, जेऊर गावात जाणारा मुख्य रस्ता, बहिरवाडी चौक, गावात जाणारी कमान, पवारवाड्या शेजारी असणारे पिंपळाचे झाड या परिसरात रोड रोमिओंचा वावर कायमच आढळून येत आहे.अल्पवयीन मुले घातक असे हत्यारे सोबत बाळगत असल्याची चर्चा आहे. जेऊर परिसरात अनेक वेळा रोड रोमिओं मध्ये हाणामारी देखील झालेली आहे.

तसेच शिक्षकांना अरेरावी करण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. मुलींची छेडछाड झाली तरी विद्यार्थीनी व पालकही बदनामी नको म्हणून तक्रार करत नाहीत याचाच फायदा रोड रोमिओ उचलत आहेत. रोड रोमिओंचा एवढा उपद्रव, दहशत वाढली आहे की वाड्या वस्त्यांवरील पालकांना आपले काम सोडून पाल्यांना शाळेत सोडविण्यासाठी व नेण्यासाठी ये-जा करावी लागत आहे.

विद्यालयाची बदनामी नको म्हणून सहानुभूती दाखवणाऱ्यांना विद्यालयातील विद्यार्थिनींना होणारा त्रास दिसत नाही का ? रोडरोमिओं बद्दल ‘ब्र’ शब्द देखील काढण्यात येत नाही. त्यांच्याबद्दल कोणी तक्रार करत नाही यामुळे पालक वर्गांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विद्यालयाची काळजी करतात परंतु तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना होत असलेला त्रास स्थानिकांना दिसत नाही का ? असा संतप्त सवाल पालक व्यक्त करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe