पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय वाळू विक्री केंद्रांचा शुभारंभ संपन्न

Published on -

माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील आठ शासकीय वाळू विक्री केंद्रांचे उदघाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.

माहेगाव देशमुख येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री श्री विखे पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्यांना स्वस्त भावात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वाळू डेपोचा निर्णय शासनाने घेतला. त्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे. कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल असल्याचेही, पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले.

आमदार आशुतोष काळे म्हणाले की, तालुक्यातील विविध विकास कामे करत असताना नागरिकांना आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या प्राथमिक केंद्रातून नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळतील. कोपरगाव तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी वर्ग करण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये उभ्या राहणाऱ्या विविध उद्योगामुळे रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले की, चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येऊन आरोग्य केंद्रांची इमारत उभारण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रामुळे परीसरातील १० गावातील ३६ हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील आठ वाळू विक्री केंद्रातून १ लक्ष ८० हजार ब्रास वाळू उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आठ शासकीय वाळू विक्री केंद्रांचा झाला शुभारंभ
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कुंभारी, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, राहाता तालुक्यातील भागवतीपुर कोल्हार बु., पाथरे बु.,

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बु., एकलहरे व संगमनेर तालुक्यातील आश्वि बु. या केंद्रांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्त्याना लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News