Ahmednagar News : शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारीचे अनाधिकृत खरेदी- विक्री व्यवहार आहेत. काही दलालांच्या मध्यस्थीने सबंधीत अधिकारी हा प्रकार करीत असून, शासनाने तत्काळ याची दखल घेऊन सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शासनाने गेल्या काही वर्षापासून ठराविक गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार बंद केले आहेत. कोणतेही भूखंड अकृषिक असल्याशिवाय त्याचे गुंठेवारी व्यवहार होत नाहीत, असे व्यवहार करण्यासाठी २० आरच्या पुढे बागाईत व ४० आरच्या पुढे जिरायत क्षेत्र असल्यास त्याचे दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी- विक्री व्यवहार होऊ शकतात.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील काही अधिकाऱ्यांकडून शासनाचे हे आदेश धुडकावत अकृषिक नसताना कृषक क्षेत्रात गुंठेवारीचे अनाधिकृत व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे.
ठराविक दलालांमार्फत अधिकारी शासनाच्या आदेशाचे पालन न करता कृषक क्षेत्राचे एक, दोन, तीन ते दहा गुंठयांचे खरेदी -विक्री व्यवहार करीत असल्याची माहिती आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी बेकायदेशीर गुंठेवारीचे बोगस खरेदी विक्री व्यवहार व अकृषिक आदेशाचा प्रकार उघडकीस आणला आहे. त्याची मंत्रालय पातळीवर चौकशी चालू असून, कर्मचाऱ्यांना याची झळ पोहचली आहे.
हा प्रकार उघड झाल्यापासून काही काळ दक्षतापूर्वक बोगस गुंठेवारीचे व्यवहार बंद झाले होते. मात्र, गेल्या चार पाच महिन्यांपासून झालेला प्रकार विसरुन एका अधिकाऱ्याने पुन्हा एकदा गुंठेवारीचे अनाधिकृत व्यवहार करण्याचा धडाका सुरू केला आहे. हा प्रकार शासनाच्या आदेशाला हरताळ फासणारा असून, याबाबत सबंधीत अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला
खरेदी-विक्री व्यवहारांच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दरवर्षी मिळतो, किंबहुना महसूल मिळण्याचे हे प्रमुख स्रोत आहे. खरेदी-विक्री व्यवहार करताना मालमत्तेचे मुल्यांकन ठरवले जाते व त्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते.
अकृषिक जमिनीचे (एन.ए.) मुल्यांकन जास्त असते, त्यामुळे महसूल वाढतो, कृषिक जमिनीचे मुल्यांकन कमी असते, त्याचे तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यास बंदी आहे, तरीही दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आशीर्वादाने असे व्यवहार सर्रास केले जात आहेत,
त्याचा परिणाम म्हणून एकट्या शेवगाव तालुक्यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. नोंदणी महानिरीक्षक या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून दखल घेतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.