Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथे छापा टाकत सुगंधी तंबाखू व गुटखा, असा सव्वा लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. चोरी छुपे गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे.
साजीद साहेबखान पठाण (वय २३, रा. श्रीरामनगर, शिर्डी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. शिर्डी येथे राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची साठवून विक्री केली जात आहे, अशी गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांना मिळाली.
त्याआधारे पथकाने शिर्डी येथे जावून वरील पठाण याच्या घरावर छापा टाकला. तेंव्हा त्याच्या घराच्या तळ मजल्यावर राज्यात बंदी असलेला सुमारे १ लाख २७ जार रुपये किमतीचा गुटखा मिळून आला.
गुटख्यासह आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली. आरोपीने सदरचा गुटखा त्याचा भाऊ अबीदखान साहेबखान पठाण याने खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही.
राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरासह जिल्ह्यात सर्रास विक्री केली जाते. गुटख्याची टपरी हटविण्यावरून शिक्षकावर हल्ला केल्याची घटना नगरमध्ये घडली होती. त्यानंतर अन्न प्रशासन, कोतवाली, तोफखाना पोलिसांकडून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वीही गुटस्वा विक्री करणाऱ्या अनेकांवर कारवाई झाली.