कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात अकल्पित बदल झाले आहेत. याच काळात विस्कटलेला संसार लोकन्यायालयात झालेल्या समझोत्यामुळे पुन्हा एकदा बहरला आहे. कोरोना काळात संवाद थांबला, एकमेकांबद्दलचे गैरसमज वाढत गेले.
तू मोठी, की मी मोठा, अशी स्पर्धा सुरु झाली. आता वेगळं झालच पाहिजे, अशी भावना बळावली आणि कोर्टाची पायरी चढलो. दोन वर्षे न्यायालयात चकरा मारल्या. मात्र न्यायाधीशांनी चार वर्षांच्या मुलाचा विचार करून समजुतदारपणाने निर्णय घ्या, असा मोलाचा सल्ला दिला आणि आम्ही आज पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षांपासून विभक्त झालेल्या त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले. ही घटना पाथर्डी तालुक्यातील लोकन्यायालयात घडली. तालुक्यातील मुलीचा पाच वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील युवकाशी झाला होता.
त्यांना एक मुलगा झाला, त्यानंतर कोरोना काळात दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. संवाद संपला आणि प्रकरण मार्च २०२१ मधे पाथर्डीच्या न्यायालयात दाखल झाले. येथील न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना समजुतदारपणाने निर्णय घ्या. संसार दोघांचाही असतो.
एक लहान मुलगा आहे, त्याचा विचार करा. दोन्ही कुटुंबांतील संबध कायमचे संपुष्टात येतील, यापेक्षा पुन्हा एकदा एकत्रीत, या असे आवाहन केले. तोपर्यंत बराच कालावधी झाल्याने ‘त्या’ विवाहितेलाही पती सोबत नसल्यावर लोकांचा महिलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला राहत नाही, याची जाणीव झालेली होती.
मी पूर्ण आयुष्य आई-वडिलांकडे राहून चालणार नाही व ते सोपे नाही, अशी धारणा झाल्याने ‘ती’ एक पाऊल मागे यायला तयार झाली. लहान मुलाकडे पाहून पतीचेही डोळे पाणावत होते. न्यायाधीश समजून सांगत आहेत, याचा अर्थ आपलच कुठेतरी चुकतयं, हे पतीने देखील मान्य केले.
अखेर रविवारी लोकन्यायालयात त्यांचा वाद वाद मिटला. अन ती विवाहिता आनंदात पतीकडे जाण्यास तयार झाली. या घटनेमुळे उपस्थित सर्वांच्याच चेहेऱ्यावरील आनंद बरेच काही सांगत होता.