Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका पंचायत कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा पुरूष कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचा आरोप होत आहे. पुरूष कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत निवेदन देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा आता या महिला कर्मचाऱ्यांनी दिला असल्याचे समजते.
पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती ग्रामिण अभियान कार्यालय येथे महिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत महिलांनी तक्रारीचा पाढा वाचला होता. त्यानंतर चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांनी संबंधित विभागाच्या महिला अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

याबाबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना उद्धटपणे, आक्षेपार्ह व अर्वाच्य भाषेत काही अधिकारी बोलत असतात. त्याची रितसर लेखी तक्रार व निवेदन दिले. या गोष्टींची इन कॅमेरा चौकशी करण्यासाठी त्यावेळचे गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यामध्ये येत्या दहा दिवसात योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी संगितले होते.
त्यानंतर पंचायत समितीच्या व्यवस्थापक यांनी या तक्रारदार महिलांचा इन कॅमेरा जबाब घेऊन या प्रकरणाची विशाखा समिती मार्फत सखोल चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल संबंधितांना देण्यात येईल. असे सांगितले होते. मात्र आजपर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नाही. पंचायत समिती स्तरावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी पंचायत समिती मधील अधिकारी आशाप्रकारे वागत असतील तर सदर बाब ही महिला सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे?
महिला सुरक्षेचा नारा देणाऱ्या सरकारी यंत्रणेत असे अधिकारी कर्मचारी असे काम करत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा पंचायत समिती कार्यालय यांना जबाबदार धरून तालुक्यात कुठेही कोणत्याही स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी निवेदनात दिला आहे.
या घटनेची चौकशी मुद्दामहून प्रलंबित ठेवली गेली असून संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबीत करण्यात यावे. या चौकशी इतक्या दिवस का प्रलंबित ठेवली, याबाबत समाधानकारक खुलासा व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.