अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- शिर्डी येथील रेल्वस्थानकावर एका तरुणाच्या संशयीत हालचालीवरून त्यास रेल्वे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावाचे आधारकार्ड व बनावट नावाने पासपोर्ट आढळला आहे.
मनोज शर्मा (दिल्ली) असे तरूणाचे नाव असून त्यास मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशनवर हा तरूण संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत एकाच नावाचे बरेच आधार कार्ड आणि बनावट पासपोर्ट मिळून आले. चौकशी केली असता मनोज शर्मा असे त्याने नाव सांगितले.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यास पोलिस स्टेशनला आणून कसून चौकशी केली असता पासपोर्ट दुसऱ्या व्यक्तीचा असून तो सापडल्याचे त्याने सांगितले, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरुणाकडील पासपोर्ट नेमका कोणाचा?
त्याचा शिर्डीत येण्याचा उद्देश काय? या सर्व गोष्टींचा उलगडा पोलिस तपासात होईल; मात्र, त्या पासपोर्टवर अनेकवेळा बांगलादेशला जाण्या- येण्याची नोंदी असल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारे बनावट पासपोर्ट आणि बनावट नावाचे आधारकार्डसह तरुण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडला गेल्याने नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम