वाळकीचे आरोग्य केंद्र, आठवडे बाजार सुरळीत ! खा. नीलेश लंके यांच्या मदत मोहीमेचा इम्पॅक्ट

Published on -
गेल्या आठवड्यात नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीनंतर रविवारी खा. नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या-त्या गावांमध्ये जात केलेल्या मदत कार्यामुळे तेथील जनजीवन सुरळीत झाले आहे. गाळाने माखलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चकाचक करण्यात आल्याने ते सोमवारी सुरळीत सुरू झाले, आठवडे बाजार भरला तर जुंदरे मळयातील रस्ताही सुरू झाला.
सारोळा कासार येथील वाहून गेलेला स्मशानभुमीचा भाग भराव टाकून पुर्ववत करण्यात आला. काळे मळयाचा रस्ता दोन पुल दुरूस्त करून सुरळीत करण्यात आला. बारवे मळयातील दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच अकोळनेर ते सारोळा शिवरस्ता खा. लंके यांच्या मावळयांनी दुरूस्त केला.
भोरवाडीच्या वाळुंबा नदीवरील पडलेला पुल दुरूस्त करण्यात आल्याने खडकवाडी येथील शेतक-यांचे दळणवळण सुरळीत झाले. दुग्ध व्यवसायिकांना डोक्यावर किटली घेऊन दूध संकलन केंद्राकडे जावे लागत होते त्या रस्त्यावरील पुलाचे व खैरेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात आल्याने दूध संकलनही सुरळीत झाले. पुल वाहून गेल्याने दळवी वस्तीचा संपर्क तुटला होता, पुलाची दुरूस्ती झाल्याने दळवी वस्तीचेही दळणवळण पुर्ववत झाले.
अकोळनेर येथील तरोडी मळा, मेहेत्रे वस्ती, थोरात वस्ती, देशमुख मळयाचा संपर्क तुटला होता. त्या त्या भागातील पूल व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आल्याने ग्रामस्थांचे जाणे येणे सुरळीत झाली. खडकी येथील जाधववाडी व अकोळनेर हा रस्ता पुल वाहून गेल्याने बंद झाला होता. हा पूलही दुरूस्त झाल्याने रखडलेली वाहतूक पुर्ववत झाली.

खा. लंकेंमुळे आरोग्यसेवा सुरळीत 

खासदार नीलेश लंके यांनी स्वतः मदत कार्यात झोकून देत आरोग्य केंद्रात साचलेला गाळ स्वतः भरला. अग्निशमन दलाचे वाहन पाचारण करून संपूर्ण आरोग्य केंद्र स्वच्छ करण्यात आले. खा. लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपार कष्ट घेउन स्वच्छता मोहिम राबविल्याने सोमवारपासून रूग्णसेवा सुरळीत झाली.

आपत्ती काळातील लोकप्रतिनिधीचे आदर्श उदाहरण ! 

खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली ही मदत मोहिम केवळ तातडीची मदत नव्हे तर पुनर्बांधणीचा एक ठोस प्रयत्न होता. शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्थानिक पातळीवर राबविण्यात आलेली ही व्यापक मोहीम आपत्ती काळात लोकप्रतिनिधीने कसे पुढे यावे याचे आदर्श उदाहरण ठरले आहे. नीलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा संघटनेचे मावळे यांनी खासदार नीलेश लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत निष्ठेने राबविलेले मदत कार्य आपत्तीग्रस्तांच्या कायम स्मरणात राहील.
खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली वाळकी येथील आरोग्य केंद्रात मदत कार्य राबविण्यात आल्याने सोमवारपासून आरोग्यसेवा सुरळीत झाली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe