हृदयस्पर्शी ! हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेला अन हृदयविकाराचा झटका आला, देवासमोरच सोडले प्राण, अहिल्यानगरमधील घटना

Published on -

सकाळची वेळ.. हनुमंत रायांच्या दर्शनासाठी एक व्यक्ती हनुमान मंदिरात गेली. परंतु तेथेच हृदयविकाराचा झटका आला..त्यांना उपचारासाठी नेण्यात आले पण तेथे नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली…भक्ताने देवासमोरच प्राण सोडले..अशी चर्चा त्यानंतर नागरिक करू लागले.. ही घटना घडलीये अहिल्यानगरमध्ये. भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात.. अधिक माहिती अशी भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.1 एप्रिल) सकाळी 7 वाजता विलास ससे हे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

दरम्यान यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य योगा-प्राणायामासाठी भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये उपस्थित होते. सकाळी 7 वाजता जॉगिंग पार्क जवळील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात कोणी तरी व्यक्ती चक्कर येऊन पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यांच्या मदतीसाठी सर्व सदस्य धावून गेले. ग्रुप मधील डॉक्टर असलेल्या सदस्यांना सदर व्यक्तीला ह्रद्यविकाराचा झटका आल्याचे लक्षात आले.

सदस्यांनी तातडीने संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली. तर शहरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करुन रुग्णाला घेऊन येत असल्याची माहिती दिली. शेवटी हॉस्पिटल गाठले, मात्र हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्याने सर्व सदस्यांच्या प्रयत्नांना अपयश येऊन ससे यांची प्राणज्योत मालवली. ग्रुपच्या सदस्यांनी हातमपूरा येथील मयत झालेल्या व्यक्तीची माहिती काढून त्यांच्या कुटुंबीयांना कळविले. ग्रुपच्या वतीने भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यासमोर विलास ससे यांना श्रध्दांजली वाहिली. या घटनेने ससे कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe