अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दिवसा उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून रात्री व पहाटेच्या सुमारास बोचरी थंडी जाणवत आहे.या विषय हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांना सर्दी,पडसे,ताप, खोकला अशा आजारांचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे दुपारच्या वेळी सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत असून अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत आहे.वातावरणात अचानक होत असलेल्या बदलामुळे अनेक आजार डोके वर काढत आहेत त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारा साठी रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे. दुपारच्या उन्हाच्या झळा सहन होत नसल्याने लोकांना सावलीचा आधार घ्यावा लागत आहे.परंतु बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडे नष्ट झाल्याने सावली मिळणेही दुरापास्त झाले आहे .

सध्या शेतात रब्बी हंगाम सुरु असून दिवसभर उन्हात मजुरांना शेतावर जाऊन शेतातील कामे करावी लागत आहेत. उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे . ऊन टाळण्यासाठी मजुर सकाळी लवकरच शेतावर जाऊन शेतातील कामे करत आहेत त्यांना दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत झाडाखाली आराम करावा लागत असून चारनंतर उरली सुरली कामे करावी लागत आहेत.यावर्षी फेब्रुवारी पासूनच तापमानात वाढ झाली असून,उन्हापासून बचावासाठी नागरिक छत्री किंवा झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत.या वाढत्या उष्णतेचा परिणाम पशु-पक्ष्यांवरही होत असून त्याची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.
पोटाला थंडावा मिळावा म्हणून अनेक जण शीतपेय,रसाळ फळांचा आस्वाद घेत आहेत. मागील काही दिवसात वातावरणात अचानक बदल झाल्याचे जाणवत असून, याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वृद्ध,लहान बालके व आजारी रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.उन्हामुळे घशाला कोरड पडत असल्याने तहान भागविण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, उसाचा रस,शीतपेये व जारमधील थंड पाण्याचा वापर करताना दिसत आहेत. मात्र असे अति थंड पाणी पिल्याने देखील सर्दी होत आहे.