अहिल्यानगर : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून, त्यामुळे शहरातील तापाच्या रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा रुग्णालयात मागील महिन्यात ५३८ हून अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी आले. तापमानातील चढ-उतारामुळे नागरिकांना थंडीताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रुग्णसंख्येत वाढ, उष्माघात कक्ष सुरू करण्याची तयारी
शहरातील खासगी दवाखान्यांतही तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तापमानातील बदल आरोग्यावर परिणामकारक
शहरात दुपारच्या सुमारास सरासरी ३४ अंश सेल्सिअस तापमान राहते, तर रात्री ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. या बदलत्या तापमानामुळे नागरिकांना थंडीतापाची लक्षणे जाणवत आहेत.
अंगावर पुरळ आल्यास डॉक्टरांचा सल्ला
नागरिकांनी दुपारच्या वेळेस गरजेव्यतिरिक्त बाहेर जाणे टाळावे. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उन्हामुळे अंगावर पुरळ आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, रस्त्यावरील दूषित बर्फाचे गोळे व शीतपेय टाळावीत आणि लिंबू सरबत, ताक यासारख्या आरोग्यदायी पेयांचे सेवन करावे.
जिल्हा रुग्णालय सतर्क
शहरातील तापमानवाढीमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत उष्माघात कक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.