Ahmednagar News : भंडारदरा भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भंडारदरा धरणामधुन पाणी सोडण्यात आले आहे. पावसाने मात्र आदिवासी बांधवांची भातशेती हिरवीगार झाल्याचे सर्वत्र दिसत आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरामध्ये गत दोन दिवसांपासुन जोरदार मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने भंडारदरा धरण पुन्हा एकदा भरले असून धरणाच्या सांडव्यासह वीजनिर्माण केंद्रातून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.

गोपाळकाल्याच्या कालावधीमध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरु झाला होता. त्यावेळी घाटघर येथे एकाच दिवसात विक्रमी साडेसात इंच पाऊस पडला होता. हा पाऊस चार ते पाच दिवस टिकून राहिल्याने भात शेतीला एक प्रकारे जिवदानच मिळाले होते;
मात्र त्यानंतर पुन्हा पाणलोटामध्ये पावसाने दडी मारल्याने भात खाचरे सुकु लागली होती. शनिवारपासून पुन्हा एकदा पाणलोटात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
भंडारदरा धरण पुन्हा एकदा अकरा हजारी झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन एक ते दिड फुट पाणी वाहत असल्याचे दिसुन आले. धरणाच्या सांडव्यातुन २४३६ क्युसेक तर वीजनिर्माण केंद्रातून ८२० क्युसेक असा एकुण ३ हजार २५६ क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत भंडारदरा येथे १७ मीमी पावसाची नोंद झाली असुन घाटघर येथे १२५ मीमी रतनवाडी येथे ४५ मीमी, पांजरे १९ मीमी तर वाकी येथे ९ मीमी पावसाची नोंद झाली. रविवारी भंडारदरा येथे दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. गेल्या १२ तासांत भंडारदरा येथे २३ मीमी पावसाची नोंद झाली.