पुढील २४ तास राज्यात मुसळधार ; नगर जिल्ह्यातील नागरिकांना दिला ‘हा’ इशारा … !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मागील २४ तासात पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अहमदनगरसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसंच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान या काळात अहमदनगर जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात प्रामुख्याने मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.

ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबाणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे.

जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे. सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe