अरे अरे : पैशाच्या वाटणीवरुन सख्या भावाचा केला कुऱ्हाडीने घाव घालून खून !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- शेळी विकून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्याने मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारदार कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, राहाता तालुक्यातील शिंगवे परिसरातील रहिवाशी मोरे कुटुंबियांचा शेळी-बकरी पालनाचा व्यवसाय आहे.

मात्र आई-वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांवरून मृत जालिंदर मोरे आणि त्याचा मोठा भाऊ महेंद्र मोरे यांच्यात नेहमी शाब्दिक वाद होते.

दोघांनाही दारुचे व्यसन असल्याने त्यांच्यात टोकाचे वाद व्हायचे. दोघेही वारंवार आई वडिलांकडे पैशाची मागणी करत तसेच कधी कधी त्यांना मारहाण देखील करीत होते.

दोघा भावांनी नुकतीच आई वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांपैकी एक बकरी चोरुन तीची विक्री केली. परंतू मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले.

दुपारच्या सुमारास दोघेही दारुच्या नशेत असताना गावातील लक्ष्मी आईच्या मंदिरासमोर एकमेकांच्या समोर आले. पुन्हा पैशाच्या वाटणीवरून दोघात भांडण झाले.

यावेळी मोठा भाऊ महेंद्र मोरे याने आपला सख्खा लहान भाऊ जालिंदर मोरे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याने जालिंदर याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात आरोपी महेंद्र मोरे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe