अहिल्यानगरमध्ये एका लग्न समारंभात कलवरी म्हणून आलेल्या १९ वर्षीय तरुणीने तब्बल ६७ तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तिला अटक करून ५७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चोरीला गेलेले उर्वरित १० तोळे दागिने तिने एका सराफाला विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
घटना कशी उघड झाली
फिर्यादी निखिल बबन वाकळे यांचे कुटुंब सावेडी उपनगरातील उदय हौसिंग सोसायटीत राहते. त्यांच्या भावाच्या लग्नासाठी घरात पाहुण्यांची मोठी वर्दळ होती. घरातील सोन्याचे दागिने कपाटात ठेवण्यात आले होते. संधीचा फायदा घेत प्रशंसा प्रशांत काळोखे (वय १९, न्यू ख्रिश्चन कॉलनी, कोठी, अहिल्यानगर) या तरुणीने चोरी केली.

दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच कुटुंबाने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुणी संशयास्पद हालचाल करताना दिसली. संशय बळावल्याने पोलिसांनी तिला अटक केली. चौकशीत तिने घराशेजारी लपवून ठेवलेले ५७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांना सुपूर्द केले.
सराफाही पोलिसांच्या ताब्यात
प्रशंसा काळोखे हिच्यावर संशय असल्याने तोफखाना पोलिसांनी तिला ताब्यात घेत विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यातील 10 तोळ्याचे दागिने सोनार किशोर लोळगे याला विक्री केले असून बाकी दागिने घराच्या बाजूला पडलेल्या मोकळ्या जागेत खड्डा करून लपवले असल्याची कबुली दिली. आरोपीने १० तोळे दागिने किशोर लोळगे या सराफाला विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यालाही अटक करून सखोल चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांची कामगिरी
ही कामगिरी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलिस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी, सुजय हिवाळे, दत्तात्रय जपे, सुनील चव्हाण, वसीम पठाण, बाळासाहेब भापसे आणि सतीश भवर यांचा समावेश होता.
पोलिसांचे आवाहन
पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी लग्न समारंभाच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या कार्यक्रमात सोन्याच्या दागिन्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारच्या घटनांना वाव मिळू शकतो.
पुढील तपास
मंगळवारी दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून चोरीला गेलेले उर्वरित सोन्याचे दागिने शोधण्याचे काम सुरू आहे.