Ahmednagar News : अहमदनगर मधील ‘या’ बाजार समितीत कांद्याला सर्वोच भाव, शेतकऱ्यांना रोख पेमेंट

Published on -

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षांपासून कांदा लिलाव बंद होता. नुकताच या बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. यावेळी १८०० ते २००० रुपये बाजारभाव निघाले.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रोख पेमेंट केले गेले अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर, संचालक अजित जामदार यांनी दिली. पहिल्याच दिवशी लाल कांद्याच्या २७०० गोण्याची आवक झाली होती.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी केल्याने बाजार भाव कमी झाले. तसेच अवकाळी पावसाची भीती यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. आता शेतकऱ्यांना श्रीगोंदा कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी आणण्यास सोपे झाले आहे.

बाजार समितीचे नूतन सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर, संचालक महेश दरेकर आदींच्या प्रयत्नाने कांदा खरेदीस सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सुरुवात झाली.

पहिल्याच दिवशी २ हजार ७०० लाल कांद्याच्या गोण्यांची आवक होऊन १ हजार ८०० ते २ हजार रुपये बाजार मिळाला. यावेळी बहुसंख्य शेतकरी व व्यापारी कांदा लिलावासाठी उपस्थित होते.

कांदा निर्यात बंदी केल्याने सध्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. निर्यातबंदीच्या धोरणामुळे ४० रुपये प्रतिकिलो गेलेला कांदा १८ ते २० रुपयांवर आला. सध्या शेतकऱ्यांचा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक परवड पाहता लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवावा असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान खा. सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी जानेवारीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe