संगमनेर- तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे घारगाव परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः पुणे ते नाशिक लेनवर ही समस्या गंभीर असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाच्या संथ गतीमुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.
एकेरी वाहतुकीमुळे गोंधळ
आंबी खालसा फाटा ते घारगाव दरम्यान सध्या मुळा नदीवरील पुलावर पुणे लेनवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक नाशिक लेनवर वळवण्यात आली आहे. परिणामी, दोन्ही दिशांची वाहने एकाच लेनवरून जात असल्याने एकेरी वाहतुकीमुळे गोंधळ वाढत आहे. अवजड वाहने, बस, ट्रक आणि खासगी वाहनांनी रस्ता ठासून भरला असून, कोंडीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना चालक परिस्थिती अधिकच बिकट करत आहेत.

दुचाकीस्वारामुळे वाहतूक कोंडीत भर
दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे ते मिळेल त्या जागेतून वाहन पुढे नेत आहेत. यामुळेच कोंडीत अधिक भर पडत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे. अनेक वेळा पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने वाहनचालकांच्या त्रासात आणखी भर पडते. काही वेळा या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वाहतुकीच्या नियोजनात शिस्त नाही, वाहतूक नियंत्रकांची अनुपस्थिती आणि कामाच्या ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्याने चालक गोंधळून जात आहेत. हे काम सुरू असल्याचे माहिती फलक दिसत नाहीत आणि मार्गक्रमणासाठी पर्यायी उपाययोजना ही नाहीत.
रस्त्याचे काम संथ गतीने
गेल्या काही महिन्यांपासून आंबी खालसा फाटा येथे बोगद्याचे काम सुरू आहे. त्यातच आता काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने वाहतूक आणखी विस्कळीत झाली आहे. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक रोजच या समस्येचा सामना करत आहेत. प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप आहेर यांनी केली आहे.
वाहनचालकांच्या या त्रासाची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित नियोजनबद्ध उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा, नागरिकांचा संताप उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.