Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हालचालींना वेग; खासदार निलेश लंके यांचा ठोस पुढाकार

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर असून, यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 430 रुग्ण क्षमतेचे शासकीय रुग्णालय स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाकडे अधिकृत पत्र : ठिकाणांसाठी सुचवले पर्याय

या निर्णयाची अंमलबजावणी गतीमान व्हावी, यासाठी खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची नुकतीच भेट घेऊन अधिकृत पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी जिल्हा रुग्णालय, नगर पासून 10 ते 15 किमीच्या परिघातचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी यासाठी १० ते १२ संभाव्य जागांचे पर्याय सुचवले असून, या पैकी एका ठिकाणी स्थळ निश्चिती करून प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

खासदार लंके यांनी पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, “अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी हे महाविद्यालय अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयाच्या सानिध्यात असणाऱ्या 10 ते 15 किमी परिघातील जागा विद्यार्थ्यांसाठी, प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी आणि रुग्णसेवेच्या अनुषंगाने सर्वार्थाने उपयुक्त ठरेल.”

स्थळ निश्चितीमध्ये सहभागाची विनंती

या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती यासाठी खासदारांनी प्रशासनाला विनंती केली आहे की स्थळ निश्चिती प्रक्रिया सुरु करताना त्यांना अवगत करण्यात यावे, जेणेकरून त्यांनी स्वतः त्यात सहभाग घेता येईल. या संदर्भात केंद्र शासनाला तातडीने प्रस्ताव सादर करणे आणि जिल्ह्यातील जनतेला या ऐतिहासिक प्रकल्पाचा लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ शिक्षणाची सुविधा नसून, आरोग्यसेवेचा कणा ठरणार आहे. ग्रामीण आणि शहर भागातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची उपचार सेवा मिळणार असून, स्थानिक तरुणांना वैद्यकीय शिक्षणाची संधी देखील उपलब्ध होणार आहे. रोजगारनिर्मिती, आरोग्यविषयक सुविधा आणि जिल्ह्याच्या एकंदर वैद्यकीय प्रगतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जनतेत उत्साहाचे वातावरण

खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे. “वर्षानुवर्षे जे स्वप्न होते, ते आता प्रत्यक्षात येते आहे. यासाठी आम्ही खासदार निलेश लंके यांचे आभार मानतो,” अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरीक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News