Ahilyanagar News : दररोजच्या जगण्यातील संघर्ष स्वतःशी बंड करण्याचे सामर्थ्य मनात निर्माण करून देतो . आयुष्यात जेवढ्या वेदना असतील तेवढीच जिंकण्याची भूक बळावते. केवळ जिंकायचंच आहे हीच भावना मनात असेल तर नियतीही आपल्या सोबत असते.
असाच काहीसा संघर्षाची किनार लाभलेला अनुभव जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुभवायला मिळाला. जिल्हा परिषद प्राथ. शाळा , एकनाथवाडी शाळेतील विद्यार्थी लक्ष्मण माने या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मोठ्या गटात गोळा फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक आणि थाळी फेक क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून इतिहास निर्माण केला आहे.लक्ष्मणच्या या यशाला संघर्षाची किनार असल्याने या यशाचं विशेष महत्त्व आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/20-1.jpg)
लक्ष्मणचे वडील हे दगड बांधकामाचे मिस्तरी आहेत, घरची परिस्थिती अगदी हलाकीची , कुटुंबात कुणीही व्यक्ती फार शिकलेली नसल्याने पोट भरण्यासाठी परंपरागत गवंडी काम करणे हाच त्यांचा व्यवसाय आहे. परंतु ज्या हातांनी आजवर हजारो दगडांना आकार दिला असेल. ज्या हातांनी आजवर अनेक जखमा सोसल्या असतील त्याच हातांनी आज जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत स्वतःच सामर्थ्य सिद्ध केलं आहे.
एकनाथवाडी शाळेत क्रीडा स्पर्धांचा सराव करण्यासाठी कोणतेही ग्राउंड उपलब्ध नाही. शाळेच्या शेजारच्या शेतामध्ये लक्ष्मण गेली २ महीने सराव करत होता. केवळ जिंकण्याची भूक त्याला यशापर्यंत घेवून गेली आहे. परिस्थिती आपल्या यशाची आडकाठी कधीच बनू शकत नाही, केवळ मनात जिंकण्याची जिद्द आणि मनात हार न मानण्याची ऊर्मी हवी .हेच आज लक्ष्मणने दाखवून दिले आहे.
“सर काहीही झालं तरी मला जिंकायचंच आहे “ ही लक्ष्मणची आर्त भावना त्याला जिंकण्याचं बळ देवून गेली. लक्ष्मणची ही जिंकण्याची उर्मी पाहून शिक्षकाने त्याला ४ किलो गोळा भेट म्हणून दिला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्पोर्ट ड्रेस खरेदी करून दिले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. गोळा फेकण्याचा सराव करण्यासाठी लक्ष्मणला शाळेतील शिक्षकांनीही मार्गदर्शन केले, अन त्याचे त्याने सोने केले.