एचआयव्ही प्रकल्प विभागात उत्कृष्ट सेवा देणार्‍यांना एचआयव्ही योध्दा सन्मानाने गौरव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एड्सला समाजातून हद्दपार करण्यासाठी जनजागृती व समुपदेशन महत्त्वाचे ठरले. एड्सवर काम करताना प्रारंभी अनेक अडचणी आल्या. समाजाचा रोष पत्कारुन काम करावे लागले.(Ahmednagar news ) 

याकामासाठी शासनाचे मोठे पाठबळ मिळाले. सर्वांनी केलेल्या कार्यामुळे सध्या एड्सचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, समाजात मोठी जागृती झाल्याची भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषण कुमार रामटेके यांनी व्यक्त केली.

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा रुग्णालय एचआयव्ही प्रकल्प विभागात उत्कृष्ट सेवा देणारे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना एचआयव्ही योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. या वर्षात उत्कृष्ट या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. रामटेके बोलत होते.

या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक दर्शना धोंडे, नोडल अधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, डॉ. विक्रम पानसंबळ, लायन्स क्लबचे कार्यक्रम समन्वयक श्रीकांत मांढरे,

अध्यक्षा संपुर्णा सावंत, प्रकल्प प्रमुख डॉ. आदिती पानसंबळ, श्रीनिवास बोज्जा, प्रसाद मांढरे, शर्मिला कदम, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. दहातोंडे, छाया राजपूत, संदीप चव्हाण, पूजा चव्हाण, शारदा पवार, सनी वागस्कर, वंदना निगुरे, अ‍ॅड. सुनंदा तांबे, डॉ. कल्पना ठुबे, स्मिता उकिर्डे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप म्हणाले की, एड्स या भयानक रोगावर अद्यापि उपचार नसून, जिल्हा रुग्णालयातील एचआयव्ही प्रकल्प विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी कमी होत आहे. एड्सबाबत करण्यात आलेली जनजागृती समाज जागृत झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर रोहिणी शेंडगे यांनी एचआयव्ही योध्दांचे कार्य उत्तमपणे सुरु असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात श्रीकांत मांढरे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा दिली. या महामारीत प्राण पणाला लावून 24 तास सेवा दिल्याने अनेकांचे प्राण वाचले.

लायन्स क्लबने देखील कोरोना काळात जनजागृती करुन सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. एड्स सारख्या भयंकर रोगाशी लढा देताना डॉक्टर व कर्मचारी यांचे योगदान प्रेरणादायी असून, त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

संपुर्णा सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाचे सेवाभावाने उत्तमपणे कार्य सुरु आहे. लायन्स वंचित घटकांच्या सेवेसाठी सदैव कटिबध्द असून, वंचितांसाठी कार्य करणार्‍या जिल्हा रुग्णालयासह सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. लवकरच मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

डॉ. विक्रम पानसंबळ यांनी जिल्ह्यात 17 हजार पाचशे एड्सचे रुग्ण नोंदणीकृत आहेत. त्यांना सेवा देण्याचे कार्य जिल्हा रुग्णालय करीत आहे. या कामात सर्व कर्मचारी मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी जाधव यांनी सन 2002 या वर्षापुर्वी शंभर नागरिकां मागे पंचवीस ते तीस रुग्ण एचआयव्ही बाधित मिळण्याचे प्रमाण होते.

मात्र सध्या समाजात झालेल्या जनजागृतीने यामध्ये मोठी घट झाली असून, टेस्टिंग देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. एड्स बाधितांना उपचारापेक्षा समुदेशन महत्त्वाचे ठरत आहे. पॉजिटिव्ह रुग्णांचे आयुष्य वाढविण्यासाठी, त्यांच्या मनातील भिती, न्यूनगंड दूर करण्याचे काम समुपदेशक करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. आभार शर्मिला कदम यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News