Home Buying Tips:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्याकरिता प्रत्येक जण धडपडत असतो. सध्या जर आपण घरांच्या किमती पाहिल्या तर त्या प्रचंड प्रमाणात वाढले असल्यामुळे प्रत्येकालाच घर खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु तरी देखील बरेच व्यक्ती होम लोन सारख्या पर्यायाचा आधार घेतात व स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु घर घेताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पैसा टाकावा लागतो आणि पैसा गुंतवणूक जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर पैसा तर जातोच परंतु आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे तुम्हाला देखील घराची खरेदी करायची असेल तर काही छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. कारण अशा छोट्या मोठ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

घर खरेदी करण्याअगोदर या गोष्टींकडे लक्ष द्या
1- अगोदर तुमचा बजेट पहा- कुठलीही गोष्ट आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपण आपला पैशांचा बजेट पाहत असतो. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही जर घर खरेदी करत असाल तर तुमचा बजेट किती आहे? या गोष्टीकडे सगळ्यात अगोदर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही रक्कम कशा पद्धतीने उभारणार आहात? यासाठी तुमच्याकडे असलेला पैसा तुम्ही वापरणार आहात किंवा नातेवाईकांची मदत घेणार की बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणार?
या सगळ्या गोष्टींची अगोदर खातरजमा करून घ्यावी. तुमचा स्वतःचा पैसा असेल तर मात्र काहीही चिंता करण्याची गरज नाही. परंतु तुम्ही जर कर्ज काढून घराची खरेदी करत असाल तर मात्र तुम्हाला तुमचे उत्पन्न किती आहे व खर्च किती आहे? या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. तुमचा खर्च आणि बचत यातून तुम्ही कर्जाचा हप्ता कसा फेडणार? या गोष्टींचे गणित अगोदर बसवावे लागेल.
2- भविष्यातील गरजांकडे लक्ष द्या- समजा आज तुम्ही वन बीएचके फ्लॅट घेणार असाल व त्यामध्ये तुमचे भागणार असेल तर याचा अर्थ असा होत नाही की भविष्यात तुमच्या गरजांमध्ये कोणताही बदल होणार नाही. याकरिता घर घेण्या अगोदर तुमच्या भविष्यातील गरजा डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे.
भविष्यामध्ये कुटुंब वाढल्यानंतर मात्र तुम्हाला जागेची कमतरता भासू शकते. त्यामुळे घर घेताना भविष्याचा विचार करून ते घर किती खोल्यांचे घ्यावे याचा विचार करून तुम्ही तुमचा बजेट पाहून योग्य निर्णय घेणे फायद्याचे राहील.
3- घराचा परिसर आणि इतर सुविधा- तुम्ही ज्या ठिकाणी घर घेणार आहात तो परिसर कसा आहे किंवा त्या भागात राहण्याचा खर्च पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. राहण्याचा खर्चामध्ये वाहतुकीच्या साधनावर होणारा खर्च आणि तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी होणारा खर्च इत्यादीचा समावेश होतो. सुविधा आणि राहण्याचा खर्च एकाच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वसाहतींमध्ये देखील वेगवेगळा असू शकतो. स्वच्छता तसेच सुरक्षा, घराची रचना, गार्डन, पार्किंग आणि मोकळा परिसर अशा विविध सुविधांमुळे यात कमी जास्त खर्च होऊ शकतो.
4- शहर किंवा परिसराचा गुन्हेगारी रेकॉर्ड बघणे- तुम्हाला ज्या शहरामध्ये घर खरेदी करायचे असेल त्या ठिकाणचा गुन्हेगारी रेकॉर्ड म्हणजेच गुन्हेगारी दर नक्कीच पाहून घ्यावा. उदाहरणच घ्यायचे झाले तर मुंबई आणि पुणे सारख्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारीचा दर आपल्याला पाहायला मिळतो. याबाबतीतली माहिती तुम्ही मालमत्ता विक्रेते आणि आरडब्ल्यूए अधिकाऱ्यांशी बोलून घेऊ शकतात. तुम्हाला ज्या वसातीमध्ये किंवा सोसायटीमध्ये घर घ्यायचे आहे ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असणे तितकेच गरजेचे आहे. तसेच तुम्हाला तुमच्या घरापर्यंत आणि सोसायटीपर्यंत नेणारे रस्ते कितपत सुरक्षित असतील हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे.
5- रोजगार आणि भविष्यातील सोयी सुविधा पाहणे- ऑफिसच्या जागा किंवा कारखाने किंवा जवळपास सुविधा असलेल्या निवासी भागांमध्ये घरांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी चांगल्या असतात त्या ठिकाणी काळानुसार घरांच्या किमती वाढत राहतात. घराजवळ रोजगाराची साधने उपलब्ध असतील तर ये जा करताना जो काही वेळ लागतो तो देखील वाचतो व खर्च देखील कमी लागतो. त्यामुळेच काही वर्षांपासून पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये घरांची मागणी वाढत आहे.
6- पायाभूत सोयी सुविधा- घर घेताना पायाभूत सुविधा हा एक महत्त्वाचा घटक असून तुम्ही ज्या ठिकाणी घर घेत आहात त्या ठिकाणी रस्ते त्यांची रुंदी कशी आहे तसेच ट्रॅफिक जाम झाली तर पर्यायी व्यवस्था आहे का? सांडपाण्यासोबतच ड्रेनेज, शॉपिंग तसेच शालेय सुविधा इत्यादी गोष्टींकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते.