रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना मिळाली मायेची ऊब स्नेहबंध फौंडेशनचा उपक्रम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-हुडहुडी भरायला लावणाऱ्या थंडीपासून बचाव करायचा असेल तर सर्वच जण निवडतात तो स्वेटर, मफलर अथवा अंगावर पांघरण्याची शाल अन् रग. मात्र, ज्यांच्याजवळ रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठीदेखील दोन पैसे नाहीत.

अथवा ज्यांना आपलं घरदार नाही अशा निराधारांना कसली आली मफलर, शाल अन् रग. अशाच थंडीत कुडकुडत रस्त्यावर झोपणाऱ्या निराधार वृद्धांना थंडीच्या दिवसात संरक्षण करण्यासाठी ऊब देणारे ब्लॅंकेट वाटताना मायेची ऊब देण्याचे काम स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी शहरात तारकपूर, लालटाकी, सिव्हिल, दिल्लीगेट, स्वस्तिक चौक, बालिकाश्रम रोड परिसरात थंडीची झळ सोसत झोपलेल्यांच्या अंगावर ब्लॅंकेट पांघरून मायेची उब दिली.

या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. अचानकपणे मिळालेल्या या भेटीमुळे गरजवंतांनी आनंद व्यक्त केला. निराधारांना आधार देणार्‍या उपक्रमाची आज खरी गरज आहे.

प्रत्येकाने सामाजिक कार्यात फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून खारीचा वाटा उचलून सामाजिक बांधीलकी जोपासावी,असे आवाहन स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. या उपक्रमात अभिजीत ढाकणे, सचिन पेंडुरकर, हेमंत ढाकेफळकर, सागर पांढरे, स्वदिप खराडे आदी सहभागी झाले होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment