Ahilyanagar Pune Highway Accident : सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी दुपारी अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द शिवारात मठ वस्तीजवळ दोन कारचा भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.

या अपघातात मारुती एर्टिगा (क्रमांक MH 12 SL 0095) आणि टाटा पंच (क्रमांक MH 02 GJ 2785) या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कैलास आबासाहेब बेंद्रे (वय ४१, रा. आंबळे) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर अर्चना कैलास बेंद्रे (रा. आंबळे), विजय शिंदे (रा. वाळवणे, ता. पारनेर) आणि एका अज्ञात महिलेसह तीन जण जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे आणि अमोल धामने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना त्वरित सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.