Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यात काल मंगळवारी (दि.१६) रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने कोरडगाव, फुंदेटाकळी, औरंगपूर परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
आज सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती, त्यामुळे दिवसभर भयंकर उकाडा जाणवत होता. त्यात दिवसभर विजेचा लपंडाव चालू असल्याने आजारी व्यक्ती, वृद्ध, बालके, यांना घरात बसणे मुश्किल झाले होते.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोरडगावसह औरंगपूर परिसरात अर्धा तास वादळी वाऱ्यासह काही अंशी गारांचा पाऊस पडला. कोरडगाव येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे बाभळीचे झाड विजेच्या तारेवर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.
वादळाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पाऊस झाल्याने वातारणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना काहीस दिलासा मिळाला.
वादळ वाऱ्याने फुंदे टाकळी येथील प्रगतशील शेतकरी अनिल नामदेव फुंदे यांचे शेळ्यांचे शेड जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने यामध्ये शेळ्या मात्र वाचल्या आहेत. नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी फुंदे यांनी तालुका महसूल प्रशासनाकडे केली आहे.
मंगळवारी दुपारनंतर आलेल्या वादळाने अनिल फुंदे यांचे फुंदे टाकळी शिवारात असलेले शेळयांचे पत्र्याचे शेड जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणच्या शेळ्या मात्र शेडच्या बाहेर काढून घेतल्याने वाचल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीमध्ये शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अनिल फुंदे यांनी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्याकडे केली आहे. वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदतीचा हात मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.