Ahmednagar News : सुमारे ९० हेक्टरच्या आसपास शेती सिंचनासाठी फॉर्म भरलेले असतानाही, निव्वळ आठ ते दहा हेक्टरवर शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. त्यानंतर दिघी चारी पाचच दिवसात बंद झाल्याने शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी वर्गानी संताप व्यक्त केला आहे.
भंडारदरा लाभक्षेत्रातील दिघी चारीवरील टेलचा चितळी, खैरी निमगाव परिसर आता पिकांना पाणी न मिळाल्याने उजाड होण्याच्या उंबरठ्यावर आहे.भंडारदरा लाभक्षेत्रातील असलेल्या या चारीला सगळ्यात शेवटी पाणी मिळण्याचे दुर्भाग्य कायम नशिबी आहे.

त्यात पाणी आले आणि आवर्तन आता वरूनच बंद झाले असल्याचे आधिकारी वर्गानी सांगितले. त्यामुळे पाणी शेतीच्या बाधापर्यंत जात नाही तेच चारी आटली. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांवर शेती सिंचनाचे फॉर्म भरूनही पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे जेमतेम असलेल्या पावसावर जगवलेल्या सोयाबीन, मकासारख्या पिकांवर आता विघ्न आले आहे. पाच सहा दिवस चालू असलेल्या चारीला कमी दाबाने पाणी चालू होते. त्यामुळे हक्काचे पाणी मुरले कुठे? याची चौकशी व्हावी व उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे,
अशी मागणी संपत वाघ, विक्रम वाघ, शहाबाई वाघ, अनिल वाघ, बाबासाहेब वाघ, विलास वाघ, योगेश शेजुळ, शिवाजीराव शेजुळ, रामभाऊ तरस यांच्यासह लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.
वंचित लाभधारक शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी न मिळाल्याने तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, तसेच १४ दिवस चालणारी दिघी चारी अवघ्या पाच दिवसात बंद केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम वाघ यांनी सांगितले आहे.