जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या दोन वर्षे अन तीन दिवसांच्या कारकिर्दीत किती कामे मार्गी लागली ; कोणते काम ठरले विशेष

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्त पदी (पुणे) बदली करण्यात आली आहे.हे आदेश महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन (सेवा) विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी मंगळवारी (दि.१८) जारी केले आहेत.या आदेशात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यासह राज्यातील नऊ आय.ए.एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांची नव्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदी बदली झाल्याने रिक्त झालेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी पदावर सिद्धाराम सालीमठ यांची दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती.तीन दिवसांपूर्वी शनिवारी सालीमठ यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कारकिर्दीस दोन वर्षे पूर्ण झाली.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी सारख्या दुष्काळग्रस्त भागात आई-वडिलांच्या करड्या शिस्तीत वाढलेल्या सालीमठ यांचे कृषी पदवीचे शिक्षण नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाले.महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच राज्य सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून दाखल होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

स्पर्धा परीक्षेचे परिश्रम करताना याच काळात सालीमठ यांची नगर जिल्ह्याच्या मातीशी नाळ जुळली.पुढे उपजिल्हाधिकारी म्हणून राज्यसभेत ते दाखल झाले.शासन सेवेतील नियमानुसार भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून अहिल्यानगर येथेच त्यांची प्रथम नियुक्ती झाली.

मागील दोन वर्षाच्या काळात प्रशासन लोकाभिमुख करतानाच विकासाच्या योजना मार्गी लावण्याचे काम सालीमठ यांनी केले.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सालीमठ यांच्या संचालनात लोकसभा व विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया देखील संपन्न झाली.

निर्दोष मतदार यादी तयार करतानाच निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निश्चितच पथदर्शी ठरला.सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव यांनी सिद्धाराम सालीमठ यांच्या नावे आपली बदली केली असून आपली नियुक्ती साखर आयुक्त,पुणे या रिक्त पदावर केली आहे.असा आदेश जारी केला आहे.