Ahmednagar News : नगर शहर व उपनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. लहान मुले व पायी चालणाऱ्या वृद्धांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून, चालल्या वाहनावरही मोकाट कुत्री हल्ला करीत आहेत.
तारकपूर परिसरात शाळेतून घरी जात असलेल्या १० वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. याप्रकरणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मनपाकडून कार्यवाही नझाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या (ठाकरे गट) युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी दिला आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तबाबत शिवसेनेने महापालिका आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, संजय शेंडगे, अंबादास शिंदे, राम आहुजा, उमेश काळे, विकी आहुजा, रिंकू आहुजा, सुहास साळवे, संग्राम कोतकर उपस्थित होते
दररोज २५ ते ३० जणांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ले
जिल्हा रुग्णालयात शिवसेनेकडून मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले दररोज २५ ते ३० रुग्ण येत आहेत.
याचाच अर्थ शहरात दररोज २५ ते ३० जणांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ला होत असल्याचे समोर येत आहे, असा दावा विक्रम राठोड यांनी केला. महापालिका याबाबत गांभीयनि उपाययोजना करत नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता राठोड यांनी व्यक्त केली.