वणव्यांनी शेकडो हेक्टर वनसंपदेची झाली राख अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव; दुर्मिळ औषधी वनस्पतीं नामशेष होण्याच्या मार्गावर

Published on -

अहिल्यानगर : वणवा हा निसर्ग संपदा व वन्य प्राण्यांसाठी खूपच घातक ठरत असतो. नगर तालुक्यात एकाच महिन्यात विविध ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदेची अक्षरशः राख झाली आहे. वणव्यांमुळे वन्यप्राण्यांचे हाल झाले तर दुर्मिळ औषधी वनस्पतींना फटका बसला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

नगर तालुक्यात वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. आर्मीचे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र तर खाजगी डोंगररांगा मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगर रांगांनी दुर्मिळ अशा औषधी वनस्पतींचा खजिना आढळतो. वनविभागाने मोठा खर्च करत विविध ठिकाणी वृक्षारोपण, रोपवन तयार केलेले आहे.

अशा क्षेत्रांना वणव्यांमुळे मोठा फटका बसत असुन वनसंपदेचे मोठे नुकसान होत असते. विविध सामाजिक संस्था व स्थानिक ग्रामस्थांकडून देखील वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असते. तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगांनी मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी व पक्षांचा मुक्त संचार आढळतो. ससा, तरस, खोकड, लांडगा, कोल्हा, उदमांजर, साळींदर, हरण, बिबट या प्राण्यांचा तर मोर व विविध जातींच्या पक्षांचा मोठा वावर आहे.

सरपटणारे घोरपड, साप, शामिलियन सरडा, पाल तसेच विविध कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे निसर्ग संपत्ती बरोबरच वन्यप्राण्यांचे, पक्षांचे अतोनात हाल होत असतात. वणव्यांमुळे वन्यप्राणी जीवाच्या आकांपाने सैरावैरा धावताना पहावयास मिळते. तालुक्यात इमामपूर घाट, बहिरवाडी, जेऊर घुरुडी डोंगर, चापेवाडी परिसरातील खंडोबा माळ,

गोरक्षनाथ गड परिसर, बायजामाता डोंगर परिसर, गुंडेगाव तसेच नगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिचोंडी पाटील परिसरातील विविध गावांनी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. लागलेल्या वणव्यामध्ये मोठी वनसंपदा नष्ट झाली असून मोठ मोठाल्या वृक्षांना देखील वणव्याचा फटका बसला आहे.

दरवर्षी साधारणता फेब्रुवारी ते जून महिन्यात दरम्यान डोंगरांना वणवा लागण्याचे प्रकार जास्त प्रमाणात घडत असतात. वणवा लागल्यानंतर वनसंपदेचे मोठे नुकसान होते. गवत वाळलेले तसेच झाडांचा पालापाचोळा यामुळे वणवा आटोक्यात आणण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी मनुष्यबळ देखील मोठे लागते. उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे वणवा रौद्ररूप धारण करत असतो त्यामध्ये आगीच्या भक्षस्थानी मोठमोठाली वृक्षही येतात.

वनविभागाचे तालुक्यासाठी जेऊर, गुंडेगाव, अहिल्यानगर अशी तीन मंडळ कार्यरत आहेत. परंतु वनविभागाकडे देखील पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची वास्तविकता आहे. जंगलात वणवा लागल्यास वन्यप्राणी मनुष्य वस्तीत येत असतात. तृणभक्षक वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो तर बिबट सारख्या प्राण्यांमुळे मनुष्य व वन्यप्राण्यांमधील संघर्ष अधिकच वाढत असतो. जंगलाला लागलेला वणवा हा संपूर्ण सृष्टीचक्रावर परिणाम करत असून वणवा लागणार नाही यासाठी वनविभाग व नागरिकांनी अलर्ट राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe