Ahilyanagar News: अहिल्यानगर- नारायणडोहो येथील मनीष साठे या भारतीय सैन्य दलातील जवानाच्या देशभक्तीने आणि त्यागाने सर्वांचे मन जिंकले आहे. लग्नाला अवघे एकच दिवस उलटला असताना, अंगावर हळद आणि हातावर मेहंदी ताजी असतानाच मनीषला तातडीने कर्तव्यावर हजर होण्याचा निरोप आला.
या निरोपाने साठे कुटुंबीय आणि नातेवाईक गहिवरले, पण मनीषने कोणतीही तक्रार न करता देशसेवेच्या कर्तव्यासाठी पंजाबकडे प्रयाण केले. ११ मे २०२५ रोजी, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, मनीषने आपल्या नवविवाहित पत्नी नमिता, आई-वडील आणि गावकऱ्यांना निरोप देत देशरक्षणाचा संकल्प केला.
हळदीच्या कार्यक्रमात निरोपाचा संदेश
मनीष साठे हा नारायणडोहो गावातील रावसाहेब मोहन साठे यांचा मुलगा. दोन वर्षांपूर्वी तो भारतीय सैन्य दलात रुजू झाला आणि सध्या ओडिशा येथे कार्यरत आहे. इमामपूर येथील अशोक रामदास मोकाटे यांची कन्या नमिता हिच्याशी त्याचे लग्न ठरले होते. यासाठी मनीषने ५० दिवसांची रजा घेऊन गावी परत येण्याचे ठरवले. ९ मे रोजी सायंकाळी हळदीचा आनंदमयी कार्यक्रम सुरू असतानाच मनीषला सैन्याकडून तातडीने परत येण्याचा संदेश मिळाला. हा संदेश येताच घरात शांतता पसरली. हळदीचा रंग अजून ताजा असताना आणि लग्नाच्या तयारीने घर आनंदाने फुलले असताना हा निरोप सगळ्यांना चटका लावणारा होता. तरीही मनीष आणि त्याच्या कुटुंबाने या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

लग्न आणि भावनिक निरोप
१० मे रोजी मनीष आणि नमिता यांचा विवाह अहिल्यानगरमधील कल्याण रोडवरील मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला. लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच, मनीषला दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर परतावे लागणार होते. ११ मे रोजी सकाळी नववधू नमिता माहेरी जाऊन अवघ्या दोन मिनिटांत सासरी परतली. त्याचवेळी मनीषची बॅग तयार झाली. निरोपाच्या वेळी साठे कुटुंबीयांचे डोळे पाणावले. नमिता, मनीषचे आई-वडील, नातेवाईक आणि गावकरी सगळे भावनिक झाले. मनीषने मात्र हसतमुखाने सर्वांना निरोप दिला आणि देशसेवेसाठी रवाना झाला. या प्रसंगाने गावकऱ्यांना साठे कुटुंबाच्या देशभक्तीचा आणि त्यागाचा प्रत्यक्ष अनुभव आला.
नमिताचा त्याग आणि देशभक्तीची भावना
मनीषच्या नवविवाहित पत्नी नमिता यांनीही या प्रसंगी आपल्या धैर्याने आणि देशप्रेमाने सर्वांचे मन जिंकले. त्या म्हणाल्या, “आम्ही लग्नानंतर देवदर्शन आणि फिरायला जाण्याचा विचार करत होतो. पण अचानक युद्ध परिस्थिती निर्माण झाली. मी माझी सगळी स्वप्ने बाजूला ठेवली आहेत. देशरक्षणासाठी मी माझे कुंकू पाठवत आहे. आता मनीष सुट्टी घेऊन कधी परत येतात, याची मी वाट पाहत आहे.” नमिताचे हे शब्द तिच्या त्यागाची आणि देशभक्तीची साक्ष देतात.