Ahmednagar News : मी पदाला न्याय देऊ शकत नाही..माफी असावी, आता थांबतो आहे..! आ. प्राजक्त तनपुरेंच्या पोस्टने खळबळ, स्वतः आ. तनपुरेंनी दिले याबाबत स्पष्टीकरण

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगरमधील राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण आ. प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने व्हायरल झालेल्या एका पोस्टने मात्र अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

सकाळी १० च्या सुमारास आ. प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘आपण सर्वांनी मला राजकीय जीवनात खुप साथ दिली, धन्यवाद ! मी माझ्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही, काही चुकलं असेल तर माफ करा. उद्या ईडीची तारीख आहे. त्याबाबतीत मी मोडेल पण वाकणार नाही.

पण इतर काही वैयक्तिक बाबी आहेत ज्यामुळे मी पदाला न्याय देऊ शकत नाही, माफी असावी, थांबतो आहे’, असे म्हणत आ. प्राजक्त तनपुरे यांनी या पोस्टमध्ये सर्वांना हात जोडले होते. त्यानंतर राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती. काहींनी ती पाहीली नंतर काही मिनिटातच त्यांनी ती पोस्ट हटवली गेली.

याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित करताच राहुरी तालुक्यातील तनपुरे समर्थकांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी करून तसेच फोनद्वारे चौकशी करून नेमके काय? अशी विचारणा करण्यास सुरवात केली. तनपुरे यांच्या समर्थकांत मोही खळबळ उडालेली पाहायला मिळाली.

आ. प्राजक्त तनपुरे हे मंत्री राहीलेले आहेत आणि युवा आमदार असल्याने त्यांना मानणारा राहुरीत मोठा वर्ग आहे. त्यामुळे या वृत्ताने कार्यकर्ते संभ्रमित झाले. आमदार नेमके काय निर्णय घेणार? का घेणार? याचे उत्तर त्यांना मिळत नव्हते.

आ. तनपुरे यांनी स्वतः पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती

माझ्या नावावर इतर कोणत्याही पेज अथवा फेसबुक अकाऊंटवरून पसरवलेली माहिती ही माझी अधिकृत भूमिका नाही अशाप्रकारची पोस्ट आता राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ते म्हणाले, माझे अधिकृत फेसबुक पेज आहे. माझ्या नावाच्या इतर कोणत्याही पेज अथवा फेसबुक अकाऊंटवरून पसरवलेली माहिती ही माझी अधिकृत भूमिका नाही. कृपया कोणी अफवा पसरवू नये. अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे त्यांनी म्हटले आहे. हे आपले अधिकृत अकाउंट असल्याचे सांगत इतर पेजवरील माहिती ही आपली अधिकृत भूमिका नसल्याचे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe