अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे धार्मिक स्थळामध्ये दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. एका समाजाने तेथील पुजाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर वातावरण प्रचंड तापले होते. वारकऱ्यांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला. दरम्यान आता या वादात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी उडी घेतली आहे.
हिंदू समाजावर अन्याय झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच त्यांनी दिला आहे. गुहा येथील कानिफनाथ महाराज मंदिराबाबत कायदेशीर मार्गाने पर्याय काढण्यासाठी दोन्ही समाजाने समन्वयाची भूमिका घ्यावी, गुहा ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत असेही ते म्हणाले आहेत.
पुजाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर गुहा येथील वातावरण चांगलेच संतप्त झाले होते. येथील वारकरी एकत्र येत मोठा मोर्चाही काढला. हिंदू संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान माजी आ. शिवाजी कर्डीले यांनी कानिफनाथ मंदिरात जात चर्चा केली. गावकऱ्यांचीही मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी तेथे आरती देखील केली.
पखवाज, टाळ, मृदूंगाची अवहेलना सहन केली जाणार नाही
गुहा येथे गेल्यानंतर कर्डीले यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. समन्वयी भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी म्हटलं की, धार्मिक स्थळामध्ये जे घडलं ते निषेधार्थ असून वारकरी संप्रदायात पखवाज, टाळ, मृदुंग यांना अन्यय साधारण महत्त्व आहे. या वादात त्यांची अवहेलना झाली हे मात्र सहन करण्यापलीकडे आहे. पुनः असे झाल्यास ते सहन केले जाणार नाही. तसेच हा गट नंबर मंदिराच्या नावे आहे.
असे असताना येथे आणखी एका धार्मिक स्थळाचे बांधकाम कसे सुरू झाले हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे आता यापुढं दोन्ही समाजाने समन्वयाची भूमिका घेतलीच पाहिजे, जर पुन्हा अशा प्रकारचा अन्याय झाला तर गंभीर परिणाम होतील असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
अबू आझमी यांना परतवून लावले
मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी भेट देण्यासाठी निघालेले होते. परंतु ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला व ‘अबू आझमी परत जा’ अशा घोषणा देत, बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मग पोलिसांनी विनंती केल्यानंतर अबू आझमी संगमनेर येथून आल्या पावली निघून गेले.