Ahmednagar News : येत्या श्रीराम नवमी निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाच्या आधारे होण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत आ. कानडे यांना राजेंद्र लांडगे यांनी नुकतेच भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, अनिस पठाण उपस्थित होते.
याप्रसंगी लांडगे म्हणाले, तसेच अर्थ संकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महसूलमंत्री यांनाही भेटणार आहोत. या अधिवेशनात तरी शासन जिल्हा विभाजन विधेयक निश्चितच एकमताने मंजूर करेल,
याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास नवनवीन उद्योग धंदे वाढीस मदत होईल. शिवाय सर्व सामान्य नागरिकांचे क्रयशक्तीत वाढ होणार आहे. येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहीर झाल्यास तो ऐतिहासिक निर्णय होईल.
खरंतर श्रीरामपूर जिल्हा हा प्रतिष्ठेचा आणि भावनिक होत चालला आहे. देशातील प्रभू श्रीरामाच्या नावाने पावन झालेले एकमेव श्रीरामपूर शहर जिल्हा होण्यासाठी संघर्ष समितीने तीन महिन्यापूर्वी श्रीरामालाच साकडे घातले.
त्याच बरोबर अयोध्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानेही पहिल्या टप्यात २२ हजार २२२ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने दुसऱ्या टप्प्यात १९ हजार ११९ वेळेस श्रीराम तारक मंत्र नामजपाने श्रीरामपूर जिल्हा होण्यास अनुकूलता निर्माण होत आहे.
प्रभू श्रीरामात श्रीरामपूर जिल्हा करण्याची अदृश्य शक्ती आहे. त्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या श्रीराम नवमी निमित्ताने श्रीरामपूर जिल्हा शंभर टक्के होईल, असा विश्वास राजेंद्र लांडगे यांनी व्यक्त केला.