Ahmednagar News : महावितरण कंपनीच्या सहयोगातून जखमी तरुणांवर उपचार करावेत, तसे न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा माकपचे तालुका सचिव एकनाथ मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील धुमाळवाडी येथे रस्त्याच्या बाजूनेच गेलेल्या विद्युतवाहक तारांचा शॉक लागून होरपळलेल्या जखमी तरुणांना महावितरण कंपनीकडून तुटपुंजी आर्थिक मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली. या दुर्घटनेतील तरुण महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जखमी झाले.
महावितरणच्या मेनलाईन जुनाट झाल्याने तारांना झोळ पडला. मात्र, यात महावितरणाचा काहीच दोष नाही, अशा आविर्भावात महावितरणचे अधिकारी वागत आहेत. गंभीर जखमींना उपचारार्थ महावितरण कंपनीने ३ हजार रुपयांत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यात रुग्णालयाचे एका दिवसाचे बिल सुद्धा सुटत नाही, असे करून महावितरण कंपनीने गोरगरीबांची थट्टा केली. मात्र जखमींना भरीव मदत करून उपचाराचा संपूर्ण खर्च उचलावा. तसे न झाल्यास महावितरणच्या अकोल्यातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माकपचे तालुका सचिव मेंगाळ यांनी दिला.
अकोल्यात तालुकाभर शेतातून वीजवाहक तारांना झोळ पडलेत. वीज खांब वाकले आहेत. किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याबाबत वारंवार आवाज ज उठवून सुद्धा हे झोळ व वाकलेले पोल दुरुस्त केले नाही.
आजवर आदिवासी समाजातील अनेकांना यामुळे जीव गमवावे लागले. पण आदिवासी गरिबांचा तालुक्यात कोणीच वाली नसल्याचा सवाल उपस्थित होत आहे.