लग्न ही केवळ दोन व्यक्तींमधील भावनिक बंधनाची बाब नसून, त्यात आर्थिक स्थिरतेचाही मोठा वाटा असतो. अलीकडच्या काळात मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जोडीदार निवडताना जागरूकता वाढली आहे.
केवळ मुलाचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण यापुरते मर्यादित न राहता, आता मुलाची आर्थिक परिस्थिती आणि त्याचा सिबिल स्कोअर याचीही चाचपणी केली जात आहे.

विवाह नोंदणी ब्युरोंमध्ये मुलांवर कर्जाचा बोजा आहे का, त्याचे बँक व्यवहार कसे आहेत आणि तो आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहे का, याबाबत विचारणा होत आहे. कर्जासाठी महत्त्वाचा असलेला सिबिल स्कोअर आता लग्नासाठीही महत्त्वाचा ठरू लागला आहे.
मुलींना आपला जोडीदार देखणा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असावा असे वाटणे स्वाभाविक आहे, पण आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने अनेक विवाहांना तडा जातो, हे विदेशातील उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. भारतातही आता ही जाणीव वाढत असून, लग्नापूर्वी मुलाचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.
मुलाने घेतलेले कर्ज वेळेवर फेडले आहे का, त्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे का, तो दिवाळखोर आहे का, याची शहानिशा केली जात आहे. सिबिल स्कोअर चांगला असेल तर भविष्यात घर, कार किंवा इतर गरजांसाठी कर्ज मिळणे सोपे होते,
पण तो कमी असेल तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मुलींच्या कुटुंबांकडून सिबिल स्कोअरची मागणी वाढली आहे, जेणेकरून लग्नानंतरच्या आयुष्यात आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागू नये.
सिबिल स्कोअर हा व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यमापन करणारा एक तीन अंकी क्रमांक आहे, जो ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. हा स्कोअर क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टवर आधारित असतो, ज्यात कर्जाची परतफेड, क्रेडिट कार्डचा वापर आणि बिलांची नियमितता याची माहिती असते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलाने कर्जाचे हप्ते (ईएमआय) आणि क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली, तर त्याचा सिबिल स्कोअर चांगला राहतो. ७५० ते ९०० हा स्कोअर उत्तम मानला जातो आणि तो आर्थिक स्थिरतेचे द्योतक आहे. परंतु स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळवणे कठीण होते, ज्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतो.
शहरातील विवाह नोंदणी ब्युरोत लग्न ठरलेल्या एका जोडप्याच्या बाबतीत मुलीकडून सिबिल स्कोअर तपासला गेला आणि मुलावर मोठे कर्ज असल्याचे उघड झाल्याने लग्न थांबवण्यात आले, हे याचे ठळक उदाहरण आहे.
या ट्रेंडमुळे मुलींची सिबिल स्कोअर तपासण्याची मागणी रास्त असल्याचे दिसते. जर मुलावर आधीच कर्जाचा बोजा असेल, तर लग्नानंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या अस्थिर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नापूर्वीच मुलाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतल्यास भविष्यातील संभाव्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो.
सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरणे, क्रेडिट मर्यादेच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त वापर टाळणे आणि अनावश्यक कर्जासाठी अर्ज न करणे महत्त्वाचे आहे.
विवाह नोंदणी कार्यालयांमध्ये ही विचारणा वाढत असल्याने आता मुलांनाही आपल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे, जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर राहील.