नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग नागरिकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. अपघात तर नित्याचेच झाले आहेत. तरीदेखील प्रशासनास जाग का येत नाही? प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरत वेळ पडल्यास नगर- मनमाड मार्गासाठी गुन्हें झेलण्यास तयार आहोत. परंतु मागे हटणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.
नगर- मनमाड महार्गावर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गुरुवारी (दि. ४ जुलै) नगर मनमाड महामार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल खेवरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मागण्यांचे निवेदन प्रशासनाच्या वतीने अभियंता दिग्विजय पाटणकर यांनी स्वीकारले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सचिन म्हसे, मनोज कपवते, सचिन गडदे, महेश शिरसाठ, हरिभाऊ साळगट, हरिभाऊ शेळके यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. खेवरे म्हणाले की, शिवसेनेने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविला आहे.
नगरला जाऊन अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले होते. महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रस्ता जैसे थे झाला आहे. त्यामुळे दैनंदिन अपघात घडून निष्पापांचा बळी जात आहे. तरीदेखील प्रशासनाला गांभीर्य नाही
प्रशासनाला धारेवर धरत कामाची मुदत किती दिवसांची आहे व काम किती दिवसात पूर्ण करणार, हे लेखी द्यावे. राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर फाटा ते पाण्याची टाकी हा रस्ता ताबडतोब दोन्ही बाजूंनी पूर्ण करावा व साईडपट्ट्या भरून वाहतुकीस खुला करावा. जेणेकरून राहुरी येथील ट्राफिक कमी होण्यास मदत होईल.
रोडच्या बाजूने नव्याने झालेल्या पाईपलाईनच्या ठेकेदारांकडून नुकसानभरपाई म्हणून साडेचार कोटी रुपये घेऊनदेखील साईट पट्टया अद्याप तशाच आहेत. त्यांना मोठमोठाले खड्डे पडले आहेत. ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रस्ता वेळेत पूर्ण झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल.
यावेळी अशोक थोरे, संजय छल्लारे, बाबासाहेब मुसमाडे, अजिज मोमीन, सचिन म्हसे, हरिभाऊ शेळके, दुबय्या शेख, भागवत मुंगसे, रोहन भुजाडी, निर्मला शिंदे, भारती वाणी, शितल गोरे, राधाबाई भुजाडी आदी शिवसैनिकांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
बारा दिवसात काम करण्याचे आश्वासन
नगर-मनमाड महामार्ग शनिशिंगणापूर फाट्यापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत दोन्ही साईडने लेयर टाकून साईट पट्ट्या १२ दिवसात भरल्या जातील, असे आश्वासन अभियंता दिग्विज पाटणकर यांनी आंदोलकांना यावेळी दिले.
नगर- मनमाड महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आणि ते देखील निष्कृष्ट दर्जाचे. अपघाताचे प्रमाण वाढले असून महामार्ग मृत्यूस आमंत्रण देतो की काय असे चित्र आहे. शनिशिंगणापूर फाटा ते पाण्याच्या टाकीपर्यंत आश्वासन दिल्याप्रमाणे बारा दिवसात काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन उभरण्यात येईल. मग गुन्हे दाखल झालेतरी मागे हटणार नाही असे शिवसेना उबाठा चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे म्हणाले.