पावसात खंड पडल्यास शेतकरी सापडू शकतात अडचणीत – कृषीतज्ज्ञ डॉ. अशोक ढगे

Published on -

संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मजुरीवर खर्च केलाय. मात्र आता पावसाने उघडीप दिली असून मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडू शकतो असे कृषीतज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले.

तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील शेतकऱ्यांना पावसाच्या खंडाबाबत मार्गदर्शन करताना नुकतेच ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, कोणतेही पीक पेरलेले असले तर त्यावर तीन किलो युरिया १०० लिटर पाण्यात विरघळून फवारणी करावी. सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी आदी पिकासाठी ही फवारणी उपयुक्त ठरेल.

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असेल, त्यांनी एक पाणी पिकाला द्यावे. नेहमीच शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो की, पिके एक पाण्यापासून जातात व उत्पन्नात घट येते. एक पाणी दिले तर शास्त्रीय भाषेत त्याला संरक्षित पाणी असे म्हणतात. या पाण्याला फार महत्त्व आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नसेल त्यांनी बाष्परोधक केओलीन आठ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच पाणी कमी असेल तर आडसरी पाण्याने भिजवावी तसेच सरीचा उताराच्या बाजूने दोन तृतीयांश भाग भिजवावा. म्हणजे त्याच्या ओलाव्याने एक तृतीयांश भाग ओला होतो.

ढगाळ वातावरणामुळे रस शोषणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, अशांचा प्रादूर्भाव होतो. त्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्क फवारावे. जास्तच किडीचा प्रभाव असल्यास कीटकनाशकाचा वापर करावा. पिकावर रोग आढळल्यास बुरशी नाशकाचाही वापर केल्यास फायदेशीर ठरेल.

उसाचे पीक फवारणी करण्यास छोट्या उंचीवर असेल. तर त्याला तीन किलो एरिया १०० लिटर पाणी व त्याबरोबर झिंक सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्य, फेरस सल्फेट शिफारशीच्या मात्रानुसार किंवा विद्राव्य स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत, असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांच्याकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News