Ahmednagar News : श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर काल शनिवारी (दि. २८) सकाळी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने बिगर राजकीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
उपोषणामध्ये श्रीरामपूरकरांसह व्यापारी, सर्वपक्षीय राजकारणी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक भागात,
गल्लीत परिसरात जिल्ह्यासाठी जनजागृतीच्या बैठकाचे आयोजन करण्यात येत असून या बैठकामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी यांच्या विनंतीवरुन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे प्रमुख प्रताप भोसले म्हणाले की, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्व प्रमुख नेते मंडळींची भेट घेऊन त्यांना या लढ्यात सहभागी करुन घेणार आहोत. जिल्हा झाला तर श्रीरामपूरच होईल अन्यथा जिल्ह्याचे विभाजन होणार नाही.
येत्या २ जानेवारी रोजी श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख सुरज आगे म्हणाले की, शासकीय कार्यालयामधील प्रमुख कार्यालये श्रीरामपूरमध्ये असून श्रीरामपूरच जिल्हा मुख्यालय व्हावं. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सुरु असलेल्या या मोहिमेमध्ये सर्वांनी बिगरराजकीय पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी मी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सुरु असलेल्या लोक चळवळीत सुरुवातीपासून असून श्रीरामपूर जिल्हा होईपर्यंत मी आपल्या बरोबर राहील, अशी ग्वाही दिली.
तसेच माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, नितीन दिनकर, सभापती सुधीर नवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर यांच्यासह अनेकांनी श्रीरामपूर जिल्हा मोहिमेसाठी सर्वपक्षीय पाठिंबा देऊन यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.