Ahmednagar News : समन्यायी म्हणता मग एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय कसा?

Ahmednagar News

Ahmednagar News : अवर्षणग्रस्त म्हणून ब्रिटिशांनी धरणे केली. पाणी देण्याच्या बदल्यात आमच्या जमिनी घेतल्या. गोदावरी उजवा डावा, भंडारदरा उजवा डावा, यांना हा कायदा लावला. मग निरा भिमा यांना हा कायदा का लावला नाही ?

जायकवाडीच्या लँड सिलिंग जमिनी घेतल्या का ? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हे न्यायदेवतेला पटते का? असा सवाल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कोल्हे कारखान्याच्या एका कार्यक्रमात उपस्थित केला.

यावेळी बिपीन कोल्हे म्हणाले की, राज्यात सिलिंग अॅक्ट कायदा आणला. आमच्या शेकडो एकर जमिनी १६ एकरावर आणून ठेवल्या. मराठवाडा, विदर्भ यांच्या जमिनी मात्र ६४ एकरावर पर्यंत ठेवल्या.

ब्लॉक काढले म्हणून आमच्या जमिनी गेल्या. त्यागापोटी आम्हाला ब्लॉक मिळाले आहे. २००५ चा समन्यायी कायदा हा द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. जायकवाडी धरणामुळे कोपरगाव तालुक्यातील जमिनी देणाऱ्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे.

समन्यायी कायदा लागू झाला. मात्र, या कायद्यातील त्रुटींबाबत आपण सातत्याने आवाज उठवला. या कायद्याच्या विरोधात स्व. शंकरराव कोल्हे व आम्ही तीव्र आंदोलने केली.

मोर्चे काढले, संघर्ष केला. या कायद्याविरोधात आपली न्यायालयीन लढाईसुद्धा सुरू आहे. मात्र, संघर्षाच्या वेळेस ते आमदार तेंव्हाही गप्पच होते. आजही ते गप्पच आहेत, अशी टीकाही बिपीन कोल्हे यांनी केली आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी तुम्ही पुढे व्हा, नाहीतर आमच्याबरोबर या, पुढे झाला तर पाठीमागे उभे राहू, पाण्यासाठी लढा ही आमची परंपरा आहे, भले मग स्वः पक्षाचे सरकार का असेना त्याला नमविले पाहिजे. शेतकऱ्यांनो ही लढाई तुमची आमची आहे, सज्ज व्हा, अशी विनंती कोल्हे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी सभासदांना केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe