पर्यटन पंढरीला अवैध व्यवसायाचा विळखा; पर्यटकांची होतेय लूट

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात मात्र सध्या भलताच प्रकार घडत आहेत.
सध्या धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने या भागात मोठ्या संख्यने पर्यटक येत आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ समजले जाते. येथील रंधा धबधबा हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. उंचावरून कोसळणारा हा धबधबा बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात.

या गर्दीचा फायदा उठवत काळी पिवळी जुगार चालविणाऱ्या जुगार चालकांनी रंधा धबधब्याला आपले लक्ष केले असून बिनधास्तपणे हा जुगार येथे चालविला जात आहे. सुरुवातीला या जुगारीमध्ये पैशाचे आमिष दाखवून त्यांचेच लोक पैसे लावून जुगार खेळतात.

हा खेळ पाहत असतानाच पर्यटकही या टेबलाभोवती गर्दी करत या जुगारीच्या आहारी जातात. अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे हरत असून मागील आठवड्यात एका पर्यटकांनी एक लाख रुपये या जुगारीत गमावले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

आणखी एक पर्यटक या जुगारीत १३ हजार रुपये हरला असून ते भंडारदरा मुक्कामी होते. तेथील व्यवस्थापकास त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली असून तातडीने या जुगारीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

भंडारदरा पर्यटन स्थळावरील धरणाच्या सांडव्याजवळही या जुगाऱ्यांनी अनेक पर्यटकांना आपल्या गळी उतरवत पैशाची भरमसाठ लूट केल्याची समजत आहे. अभयारण्यातील प्रमुख धबधब्यांजवळही हे जुगारी चालक आपले दुकान थाटत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

राजुर पोलिसांसमोर रंधा धबधबा तसेच परिसरात सुरू असलेला हा जुगार बंद करण्याचे मोठे आव्हान उभे असून त्यांनी तातडीने या जुगार चालकांना ताब्यात घेऊन कारवाई करावी, अशी मागणी रंधा धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe