शेवगाव व नगर येथून झाडांची अवैध कत्तल करून वाहतूक करणाऱ्या तीन माल ट्रकवर टाकळी ढोकेश्वर वन विभागाने कारवाई केली.५ जानेवारी रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. हे तीनही ट्रक टाकळीच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत.
चांगदेव सर्जेराव मुळे (रा. कल्याण) भाऊसाहेब विष्णू दराडे (शेवगाव) काकासाहेब तुकाराम चौधरी (शेवगाव) या तीन ट्रक चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शुक्रवारी ५ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना नगर कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर क्षेत्रात मुंबईकडे चालले असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, टाकळी ढोकेश्वर वन परिमंडल अधिकारी किशोर गांगर्डे, वनकुटेचे वन परिमंडल अधिकारी सचिन गांगर्डे, वनरक्षक धर्मवीर तोरंबे, गजानन वाघमारे, विजय ननवरे, किरण जाधव या वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
नगर कल्याण महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवैध लाकडांची वाहतूक होत असल्याची माहिती टाकळी ढोकेश्वर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. त्यानुसार ही कारवाई केली असून सदर ट्रक मालकावर वनविभाग कायद्यानुसार दंडात्मक व इतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वन परिमंडल अधिकारी किशोर गांगर्डे यांनी दिली आहे.