राहुरी शहर येथील आठवडे बाजारात ठेकेदाराने शेतकऱ्यांकडून पालिकेने ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त रक्कम वसूल केली असल्यास ती त्यांना तातडीने परत द्यावी व संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून ठेका रद्द करावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार हा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील आठवडे बाजारामधील सर्वात र्वात मोठा बाजार म्हणून गणला जातो. आठवडे बाजारला येणाऱ्या बाजारकरू शेतकऱ्याकडून जो दैनंदिन कर पालिका वसूल करते, त्याचा ठेका शहरातील एका युवकास दिला आहे.
हा ठेकेदार कामगार, बाजारला येणाऱ्याकडून आवाच्या सवा कर गोळा करीत असल्याच्या अनेक तक्रारी बाजारकरू, व्यापारी, शेतकरी यांच्याकडून होत होत्या पण त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत होते.
आज त्यांच्या या तक्रारीवरून आमदार तनपुरे यांनी सायंकाळी आठवडे बाजारात फेरफटका मारून माहिती घेतली असता संबंधित ठेकेदार व त्याचे कर्मचारी दरवर्षी ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त कर वसूल करत असल्याचे निदर्शनास आले.
आमदार तनपुरे यांनी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक यांना बोलावून याबाबत चौकशी करून त्यास तातडीने निलंबित करण्याच्या सूचना केल्या व पालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले.
गुरवार हा राहुरी शहरातील बाजाराचा दिवस. सहज बाजारात फेरफटका मारत असताना तेथील भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर असे जाणवले की, नगरपालिकेने आठवडी बाजार कर वसुलीसाठी ठेवलेला ठेकेदार शेतकऱ्यांकडून दामदुपटीने पैसे वसूल करत आहे.
त्वरित नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक विकास गट कांबळे या अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला आणि ठेकेदारावर कडक कारवाईचे आदेश दिले. शहरात परिसरातील गोरगरीब शेतकरी मोठ्या आशेने शेतमाल विक्रीसाठी येत असतात. काबाडकष्ट करून पै-पै जमवत असतात.
अशातच लूट करणाऱ्या या ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्याची सूचना आ. तानपुरेंनी अधिकाऱ्यांना केली. संबंधित ठेकेदारावर मेहरबान असणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची सूचना केली. याशिवाय आतापर्यंत शेतकऱ्यांकडून उकळलेले अतिरिक्त पैसे ठेकेदाराकडून वसूल करून शेतकऱ्यांना परत द्यावे, अशी सक्त ताकीद दिली.
नगरपालिकेने ठेका ९ लाख ७८ हजार ५०७ रुपयास दिला असून ठेक्याची मुदत ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे. पालिकेच्या अटी व शर्ती नुसार ठेकेदाराने ५० टक्के रक्कम रोख भरली असून उर्वरित रकमचे हप्ते बांधून घेतले आहे.
नगरपालिकेने ठेकेदारास आठवडे बाजारात माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडून १५ रुपये, व्यापाऱ्यांकडून २० तर किराणा कटलारी कापड अशा व्यवसायिकांकडून २५ रुपये ठरवून दिला आहे. हा ठेका प्रशासकाच्या काळात ऑक्टोबर २०२३ मध्ये मंजूर केला आहे.