Ahmednagar News : पोलिसांनी छापा टाकून १८ लाखांचे बेकादेशीरत्या विक्री करताना डिझेल व इतर साहित्य जप्त केले. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी जवळील जावळे वस्ती परिसरात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जवळ असणाऱ्या जावळे वस्ती परिसरात डिझेल सदृश्य ज्वलनशील इंधनाचा स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर विक्री करण्याचे उद्देशाने असुरक्षितरित्या साठा करून ठेवला होता. या ठिकाणी डिझेल विक्री करण्यासाठी पोर्टेबल डिलेव्हरी मशीन संच बसविलेला होता.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, या ठिकाणी डिझेल पंप कायदेशीर असल्याचे भासवुन त्याद्वारे ग्राहकांना डिझेल विक्री केली जात होती.
पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती समजताच डिझेल विक्री करणारा परप्रांतीय इसम हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. पोलिसांना या ठिकाणी १८ लाख रुपये किंमतीचे २१ हजार लिटर डिझेल, लोखंडी टाक्या आढळल्या.
याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात सोजित्रा भाविनकुमार आनंदभाई (वय २९, मुळ रा. सुरत, गुजरात) सध्या राहणार आनंदवाडी व जागा मालक नितीन सुनिल गोसावी (रा. संगमनेर) यांच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.