पोहेगाव- पोहेगावातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. “आई, मी सुट्टी टाकून पाडव्याला घरी येतोय,” असं साहिलनं फोनवरून आपल्या आईला सांगितलं. त्या फोननं आईच्या चेहऱ्यावर हसू फुललं, पण हा आनंद फार वेळ टिकला नाही.
अवघ्या काही क्षणांतच मुलाच्या अपघाताची बातमी आली आणि गुडघे कुटुंबावर शोककळा पसरली. साहिल दिलीप गुडघे या तरुणाचं आयुष्य अचानक संपलं आणि त्याच्या घरच्यांचं जगच उद्ध्वस्त झालं.

सोनेवाडीचा साहिल हा तुकाराम बाबुराव गुडघे यांचा नातू होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता सिन्नर-संगमनेर जुन्या रस्त्यावर एका स्विफ्ट कारनं त्याला जोरदार धडक दिली आणि या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बुधवारी सायंकाळी सात वाजता तो मेसमधून जेवण करून आपल्या पल्सर गाडीवरून रूमकडे निघाला होता, तेव्हाच हा अपघात घडला. साहिलनं आपलं एम फार्मचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि तो सध्या अमृतवाहिनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून इंटर्नशिप करत होता.
त्याच्या करिअरला अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती आणि तो आपल्या भविष्याची स्वप्नं रंगवत होता.
गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता साहिलनं आपल्या आईला शेवटचा फोन केला. “मी पाडव्याला घरी येतोय,” असं त्यानं सांगितलं आणि सुट्टीचं नियोजनही बोलून दाखवलं.
आईनंही त्याचं स्वागत करण्याची तयारी सुरू केली असेल. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. साहिल घरी परतण्यापूर्वीच त्याच्या अपघाताची बातमी घरी पोहोचली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
एका क्षणात सगळं संपलं. ज्या मुलाला पाडव्याला घरी यायचं होतं, तो आता कधीच परतणार नाही, ही वेदना त्याच्या घरच्यांना सहन करणं कठीण आहे.
हा अपघात म्हणजे साहिलच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर गावासाठीही मोठा धक्का आहे. एक हुशार आणि मेहनती तरुण असा अचानक जावा, हे कोणालाच पटत नाही.
साहिलच्या आईच्या डोळ्यांपुढे त्याचा तो शेवटचा फोन आणि त्याचं “घरी येतोय” हे वाक्य कायमचं कोरलं गेलंय. या घटनेनं रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा समोर आलाय. पण साहिलच्या कुटुंबासाठी आता हे सगळं मागे पडलंय; त्यांच्यासाठी फक्त त्याच्या आठवणी आणि शोक उरलाय.