शेवगाव-पाथर्डी तालुक्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करा !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाने शेवगाव पाथर्डी तालुक्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा मंगळवार दि. ५ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे तूर, बाजरी, कपाशी पीक सस्नेह भेट आंदोलन करण्यात येईल. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले.

यावेळी काकडे म्हणाल्या की, शेवगाव-पाथर्डी तालुक्यात हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत. त्यामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याने पावसाअभावी पिके सुकून चालले आहेत. विहिरीचे पाणी आटत चाललेले आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्यांना तूर, कपाशी, बाजरी या पिकांचा आधार असतो. पावसाचे पहिले तीन महिने संपले आहेत. शेतकऱ्यांनी महागाचे बी-बियाणे खरेदी करून मशागत, खुरपणी, खते यासाठी मोठी गुंतवणूक पिकांमध्ये केलेली आहे.

त्याने केलेले श्रम गुंतवणूक वाया जाताना तो हताशपणे पाहत आहे. शासनसुद्धा याच मुद्द्यावर थंड आहे. शासनाने आता शेतकऱ्यांना धीर द्यायला हवा तसेच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे मागेल त्या गावाला वाडी वस्तीला टँकरने पाणीपुरवठा

करावा. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी व लम्पीच्या प्रादुर्भावामुळे दावाणीवर चारा जनावरांना देण्याची व्यवस्था करावी. शासनाने अल्प रकमेत पिकांचे विमे उतरवलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांची पिके आता येऊ शकणार नाहीत त्या पिकांच्या विम्याच्या बाबतीत सरकारने हालचाल करावी.

तसेच शेतकऱ्यांच्या मालाचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाईचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना करावे. या मागणीसाठी मंगळवार दि.५ सप्टे २०२३ रोजी तहसील कार्यालयावर शासनाला जागा आणण्यासाठी वाया गेलेल्या तूर, बाजरी, कपाशी पिकांची सस्नेह भेट आंदोलन आम्ही करणार आहोत.

असेही हर्षदा काकडे म्हणाल्या. यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe