अहिल्यानगर- अहिल्यानगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बनावट शिक्के तयार करून एका चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल १६ लाखांची फसवणूक झालीये.
इन्कम टॅक्स आणि जीएसटीच्या परताव्याच्या नावाखाली ही रक्कम लंपास केली गेली. हा सगळा घोटाळा २०२१ ते २०२३ दरम्यान घडला. अखेर मंगळवारी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेलाय.

या प्रकरणात सचिन अप्पासाहेब दाभाडे (वय २९, रा. महेश्वरी पार्क, गुलमोहर रोड, सावेडी) नावाचा तरुण आरोपी आहे. फसवणूक झालेले देवेंद्र अण्णासाहेब पाटील (रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
देवेंद्र हे स्वतः सीए आहेत आणि चाणक्य चौकात ‘डी.ए.पाटील अॅण्ड असोसिएट्स’ नावाने त्यांचं ऑफिस आहे. सचिन हा त्यांचा नातेवाईक आहे आणि इन्कम टॅक्स, जीएसटीच्या परताव्याचं काम पाहत होता.
ही गोष्ट एप्रिल २०२३ पासून घडायला सुरुवात झाली. सचिनने देवेंद्र यांच्याकडे येऊन ‘सूर्या होलमार्किंग’ या फर्मसाठी हॉलमार्किंग ब्यूरोचं रॉयल्टी पेमेंट केल्याचं प्रमाणपत्र मागितलं. देवेंद्र यांनी कागदपत्रं तपासून ते प्रमाणपत्र दिलं.
त्यानंतर तुषार कपाळे यांच्या आयकर परताव्यासाठी लागणारी कागदपत्रंही तपासून सचिनला प्रमाणपत्र दिलं. पण त्यानंतर सचिन ऑफिसात दिसेनासा झाला. मग हळूहळू सत्य बाहेर आलं.
सचिनने चक्क देवेंद्र यांच्या ‘डी.ए.पाटील अॅण्ड असोसिएट्स’ या फर्मचा बनावट शिक्का तयार केला होता.
त्याच्या बनावट सहीने तो सूर्या हॉलमार्किंगचे राजेश बाळासाहेब भोसले आणि त्यांचा भाऊ किशोर बाळासाहेब पाटील यांच्याकडून इन्कम टॅक्स, जीएसटी आणि बिलाच्या परताव्याच्या नावाखाली २०२१ पासून वेळोवेळी तब्बल १६ लाख ८१ हजार २९९ रुपये घेतले.
हे पैसे त्याने धनादेशाद्वारे आपल्या ‘एस.डी.असोसिएट्स’च्या बँक खात्यात टाकून वापरले. एका सीएला असा चुना लावणं म्हणजे खरंच धक्कादायक आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.