Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्या पाठोपाठ आता ह्या प्राण्याची दहशत !

Published on -

Ahmednagar News : जंगलातील हिंख प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे. त्यामुळे बिबट्यासारखा जंगली प्राणी अनेक शिवारात नेहमीच आढळुन येतो. संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पट्ट्यातील गावांमधील नागरीकांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन घडले. यापूर्वी हे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करत होते;

मात्र आता हे बिबट्ये दबा धरून माणसावर हल्ले करत असल्याच्या घटनांमध्ये मागील दोन महिन्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यात भर म्हणून सध्या दाढ खुर्द येथे दोन तरसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे बिबट्यापाठोपाठ परिसरात आता तरसाची दहशत निर्माण होत आहे.

याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की मागील दोन महिन्यांपासून दाढ खुर्द शिवारात बिबट्या या हिंस्र प्राण्यांची दहशत पहायला मिळत आहे. बिबट्या बिनधास्तपणे वावरत असून अनेक माणसांवर या बिबट्याने हल्ला केला आहे. हल्ला झाल्यानंतरचे अनेक फोटो व व्हीडीओदेखील समाजमाध्यमातून वायरल होत आहेत.

अशा परिस्थितीत बुधवार व गुरुवारी एक नव्हे तर दोन तरस फिरताना दिसले. हे भितीदायक दृश्य एका शेतकऱ्यांने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. वनविभाग मागील आठ दिवसांपासून बिबट्या जेरबंद करण्यासाठी दाढ खुर्द शिवारात तळ ठोकून आहे. बिबट्यासाठी परिसरात तब्बल पाच पिंजरे लावुन त्यामध्ये भक्ष्य ठेवूनही तो हुलकावणी देत आहे.

आता दोन तरस दिसल्याचा फोटो वायरल झाल्यामुळे नवे संकट उभे राहिले आहे. पाबळे वस्ती व गिते वस्तीजवळ ही बिबटे मुक्तसंचार करताना नागरीकांना नजरेस पडले आहेत. तसेच गोकुळ गिते यांच्या शेतात त्यांनी दोन बिबटे व तीन तरस पाहिले असल्याची माहिती सरपंच सतिश जोशी यांनी दिली.

परिसरातील रंभाजी जोशी, बाबुराव जोशी, पांडुरंग जोशी, विजय कहार, गोकुळ गिते यांच्या शेतात पाच पिंजरे व त्यामध्ये भक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे या पिंजऱ्याच्या अवतीभवती रात्री तरसाचा वावर वाढला असल्यामुळेच बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नसावा, अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe